शाहुवाडी : प्रतिनिधी
शाहुवाडी तालुक्यातील पिशवी येथील अंगणवाडीला पावसामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या गावातील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेऊन आपल्या शाळेत जावे लागत आहे. या मुद्द्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पिशवी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे पिशवी गावातील अंगणवाडीसमोर पाण्याचे तळे साचले आहे. त्याचबरोबर गवत आणि झाडाझुडपांनी वेढा घातला आहे. या अंगणवाडीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पाण्यातून आणि गवतातूनच वाट काढत शाळेच्या रस्त्वरून मार्गक्रमण करत आहेत. शाळा व्यवस्थापन कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना करूनही या मुद्द्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शाळा व्यवस्थापन कमिटी व ग्रामपंचायत प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करून लहान मुलांची होणारी गैरसोय टाळावी — विकास खाडे (पालक).