मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत मोबाईलवर पत्ते खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या घटनेची दखल घेत महायुती सरकारने तात्काळ पावलं उचलत कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालय काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू नेते आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिलं जाणार आहे. याआधी भरणे हे महाविकास आघाडीच्या काळातही मंत्री होते आणि सध्या महायुती सरकारमध्येही कॅबिनेट मंत्री आहेत. शेतकऱ्यांबाबत कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही त्यांच्या खात्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले असून, अजित पवार यांच्या गटातील अत्यंत विश्वासार्ह चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. कृषी मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं त्यांच्या हातात देण्यात येणं, ही अजित पवारांच्या निर्णयशक्तीची झलक मानली जात आहे.
दरम्यान, कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक सेवा मंत्रालय सोपवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून खाते बदलाबाबत अधिकृत प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात विचारले असता, दत्तात्रय भरणे यांनी ते सध्या इंदापूरमध्ये असून शेतात काम करत असल्याची प्रतिक्रिया दिली.
याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये कोकाटेंचा राजीनामा घेण्याऐवजी खातेबदल करून गोंधळ निवळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता यावर विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र, कोकाटेंच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचं स्पष्ट होतंय, आणि महायुती सरकारने त्यावर केलेली तातडीची प्रतिक्रिया ही दबावाखाली घेतलेली कारवाई असल्याची टीका विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे.
———————————————————————————






