बांबवडे : प्रसारमाध्यम न्यूज
शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे जवळील ठमकेवाडी गावात नागरिकांनी रविवारी गल्लीत उतरून जोरदार आंदोलन केले. गल्लीतील गटारे तयार करण्याचे काम सुरू असताना ऐन पावसाळ्यात ते थांबवण्यात आल्याने सर्व रस्त्यात केवळ राडारोडा आणि चिखल झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. या विरोधात ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले.
ठमकेवाडी येथील मुख्य गल्लीत गटार तयार करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आले होते. मात्र, सरपंच मानसिंग पाटील यांनी राजकारणातून हे काम अचानक थांबवून दुसऱ्या गल्लीत सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गल्लीत सर्वत्र खोदकामातून निघालेला राडारोडा आणि चिखल झाला आहे.
अचानक काम थांबवल्यामुळे नागरिक अत्यंत संतप्त झाले असून घाणेरड्या राजकारणातून अशा पद्धतीची कृती करणे अत्यंत चुकीचे आणि अशोभनीय आहे असा आरोप करीत ग्रामस्थ आणि महिला यांनी जोरदार आंदोलन केले.ताबडतोब हे काम पूर्ववत सुरू करून गटार पूर्ण करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली असून ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच गोगवे येथील मानसिंग पाटील यांनी मात्र, या संदर्भात संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, ठमकेवाडी येथील ग्रामस्थांनी या विरोधात आता ग्रामपंचायतीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे ही तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थ सुरेश अतिग्रे, अर्जुन तडवळे, तानाजी ठमके यांनी सांगितले.
—————————————————————–