मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
राज्य सरकारने अखेर पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या त्रिभाषा सूत्राचे दोन्ही वादग्रस्त शासन निर्णय (जीआर) रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे. या निर्णयानंतर ठाकरे गट आणि मनसेने ५ जुलै रोजी जाहीर केलेला एकत्रित मोर्चा रद्द करण्यात आला असला, तरी आता त्या दिवशी विजयी मेळाव्याचा जल्लोष रंगणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा केली. यामुळे मराठी भाषिकांसह विविध संघटना आणि विरोधकांच्या आंदोलनाला मोठ यश मिळालं आहे.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैच्या मोर्चा बाबत मनसे, इतर पक्ष आणि विविध संस्थांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. “राजसाहेब, सरकारने जीआर रद्द केला, आता पुढे काय करायचं?”, असा सवाल राऊतांनी केला. त्यावर खुद्द संजय राऊतांनीच “विजयी मेळावा करूया,” अशी सूचना दिली. यावर राज ठाकरे यांनीही सहमती दर्शवत, “हो, चालेल…५ जुलैला विजयी मेळावा घेऊ,” असं स्पष्ट केलं.
या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार असून, मराठी अस्मिता, मातृभाषेचा अभिमान आणि सरकारच्या निर्णया विरोधातील लोकशक्तीचा विजय साजरा केला जाणार आहे.
राज्यात त्रिभाषा सूत्रातून हिंदी शिकवण्याच्या सक्तीला विरोध म्हणून गेल्या काही दिवसांपासून जनआंदोलन तापले होते. विशेषत: मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे गट, मनसे आणि इतर पक्षांनी सरकारवर प्रचंड दबाव आणला. अखेर सरकारला माघार घ्यावी लागली असून, यामुळे ५ जुलैचा विजयी मेळावा राजकीय दृष्ट्या लक्षवेधी ठरणार आहे.
————————————————————————————————



