प्रसारमाध्यम l दिग्विजय रा.माळकर
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत, निवडणुकीपूर्वी हातमिळवणी केलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात स्वीकृत नगरसेवक पदावरून मतभेद वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करणारे राज ठाकरे यांनी अलीकडेच शिंदेंची भेट घेतली, या भेटीनंतर राजकीय समीकरणांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत, शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचा मनसेकडून दावा करण्यात आला आहे.
स्वीकृत नगरसेवक पदावरून निर्माण वाद
मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसेकडून मागणी करण्यात आली होती, मात्र ठाकरे गटाने आपल्या कोट्यातील तिघांची नावे निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे मनसेला अपेक्षित पद मिळणार नाही, अशा चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, 28 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नेत्यांच्या प्रतिक्रिया
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरून सूचक वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली, कोत्या मनाच्या प्रवृत्तींकडून स्वीकृतीची अपेक्षा ठेवू नये, असा टोला त्यांनी लगावला.
तर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सावध भूमिका घेत, दोन्ही पक्षप्रमुख एकाच घरातील असून निर्णयांवर भाष्य करणे योग्य नाही, असे म्हटले आहे.
मनसेकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणताही अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील.
राज-शिंदे भेटीचे राजकीय परिणाम?
महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही पहिली अधिकृत भेट होती, मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली, या भेटीनंतरच उद्धव ठाकरे यांनी स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान ठाकरे बंधूंच्या संभाव्य मतभेदामुळे विरोधकांकडून राजकीय टीका सुरू झाली आहे, पुढील काळात ही युती टिकणार की मतभेद वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






