कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शाहुवाडी तालुक्यात कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाला पाणंदीचे स्वरूप आले आहे. इतका हा रस्ता दयनीय झाला आहे. सध्या पाऊस सुरु असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना कसरतच करावी लागते. मग दुचाकी असो कि चारचाकी असो. एक खड्डा चुकविताना दुसरा येतो. दुसरा खड्डा चुकविताना समोरून वाहन येते. अशा स्थितीत वाहनधारकांना जीव मुठीत धरून चिखलातून प्रवास करावा लागत आहे.
कोल्हापूर रत्नागिरी हा चोवीस तास रहदारीचा रस्ता. या रस्त्यावरून अवजड वाहतूकही होते. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता चकाचक दिसत होता. पण या रस्त्याला दोन पावसातच भकास रूप प्राप्त झाले आहे. दर पाच-सहा फुटावर खड्डा असे रस्त्याचे चित्र आहे. शिवाय या रस्त्यावर पावसामुळे वाहून आलेली लाल माती आहे. शिवाय खड्ड्यातील सुटलेली खडी व खड्ड्यात टाकलेला मुरूम यामुळे चिखल, खडी असे तयार झालेले मिश्रण वाहनधारकांना खूपच धोकादायक ठरत आहे. वाहन खड्ड्याला चुकवायचे कि खडीयुक्त चिखलाला, असे आव्हाण वाहनधारकांसमोर असते. अशा खड्डे, चिखलाने तयार झालेल्या रस्त्यावरून गाडी चालविताना अपघातही होऊ शकतो.
शाहुवाडी तालुक्यातून गेलेल्या नागपूर- रत्नागिरी या नवीन महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तर जुन्या महामार्गाकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे महामार्गावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पडलेल्या खड्यांत ठेकेदाराकडून मुरूम आणि माती टाकली जात आहे . त्यामुळे डांबराची जागा मुरुम आणि मातीने घेतल्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या चिखलातून आणि पडलेल्या खडड्यांतून अगदी जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. त्यात शाहुवाडीत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खडड्यांत पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. या प्रवासा दरम्यान काही वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे तर काहींना गंभीर दुखापत देखील झाली आहे . त्यामुळे संबंधित विभागाने त्वरीत रस्त्यावर पडलेले खड्डे डांबर टाकून बुजवावेत आणि वाहनधारकांची होणारी गैरसोय थांबवावी.
———————————————————————————————-