Satnavari in Nagpur district has been developed as the country's first 'smart' and 'intelligent' village. Speaking at the inauguration of this village, which has been built on an experimental basis, Chief Minister Devendra Fadnavis said
नागपूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील दहा गावे ‘स्मार्ट ’ व ‘ इंटेलिजेंट ’ करण्यात येणार आहे. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास ३ हजार ५०० गावे ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या या आधुनिक सुविधा असलेल्या गावाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेस (व्हाईस) या संस्थेने देशातील २४ तंत्रज्ञान कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत, राज्य शासन व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून दिल्या. यामुळे नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे देशातील पहिले ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ गाव म्हणून घडविण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या या आधुनिक सुविधा असलेल्या गावाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
या प्रसंगी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, सातनवरी गावाच्या सरपंच वैशाली चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून गावात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातनवरी हे स्मार्ट व इंटेलिजेंट गाव घडविणे हे क्रांतीकारक पाऊल आहे. गावांना सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून भारतनेट प्रकल्प राबविण्यात आला. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यात महानेट प्रकल्पही सुरू झाला. याच प्रवासात भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे गाव उभारले गेले आहे.”
गावात आरोग्य, शिक्षण, स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे कीटकनाशके व खत फवारणी, ‘बँक ऑन व्हील’, स्मार्ट टेहळणी आदींसह एकूण १८ आधुनिक सेवा अल्पावधीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गावातील शेतकरी आता ड्रोन व सेन्सर तंत्रज्ञानाचा उपयोग करून माती परीक्षण, फवारणी व खतांचे अचूक नियोजन करीत असून, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतील. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने गावकऱ्यांचे आरोग्य सुधारेल. टेलिमेडिसिन सुविधेमुळे गावातच उपचार व आरोग्य सेवा उपलब्ध होतील.
शिक्षण क्षेत्रातही सातनवरीने आधुनिकतेची पावले टाकली असून, कृत्रिम बुद्धिमत्ता व स्मार्ट शिक्षण यांचा वापर करून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील ज्ञान मिळणार आहे.
सातनवरी गाव देशातील पहिले ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ गाव ठरल्याने लवकरच हे गाव संपूर्ण देशासाठी ‘रोल मॉडेल’ ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. “येथील ग्रामस्थांनी या सेवांचा योग्य प्रकारे वापर करून सातनवरीने देशातील सर्वात प्रगतीशील गाव म्हणून नावारूपाला यावे,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.