Team India Jungle Safari : भारत न्यूझीलंड टी-२० सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंची जंगल सफारी

0
67

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना बुधवारी नागपुरात खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी सरावातून वेळ काढत निसर्गसौंदर्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडियाचे काही खेळाडू नागपूरजवळील मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील तुरिया गेट परिसरात जंगल सफारीसाठी दाखल झाले होते.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ दोन दिवस आधीच नागपुरात पोहोचला होता. सोमवारी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि रवी बिश्नोई यांनी पेंचच्या जंगलात सफारीचा अनुभव घेतला. या सफारीदरम्यान खेळाडूंना वाघाचे दर्शन झाले नसले, तरी बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती आहे.

वन्यजीव तज्ञ वरुण ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी जंगलातील जैवविविधता, वन्यप्राणी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाविषयी माहिती घेतली. क्रिकेटच्या धावपळीच्या आयुष्यातून काही काळ बाजूला होत खेळाडूंनी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला.

नागपूरला ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते. शहराच्या आजूबाजूला अनेक व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे नागपूरची ही वेगळी ओळख आहे. अशाच या व्याघ्र राजधानीत भारत–न्यूझीलंड टी-२० सामना होत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात ऊर्जा साठवून आता भारतीय खेळाडू मैदानात न्यूझीलंडविरुद्ध दमदार कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत. भारत–न्यूझीलंड टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जानेवारी रोजी नागपुरात खेळवला जाणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here