पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
दरमहा शिक्षकांच्या पगारासाठी शासनाकडून २० तारखेपूर्वी निधी वितरित केला जातो. मात्र, गणेशोत्सवामुळे ऑगस्ट महिन्याचे वेतन काही दिवस आधीच होणार असून यासाठी लागणारा निधी दोन-तीन दिवसांत वितरित केला जाणार आहे. यामुळे शिक्षकांना वेळेत वेतन मिळणार असल्याची आशा निर्माण झाली आहे.
मात्र, नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणानंतर आता राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील पावणेपाच लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर २०१२ पासूनची कागदपत्रे शालेय शिक्षण विभागाने मागवली आहेत. आदेशानुसार ज्या शाळांचे मुख्याध्यापक संबंधित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करतील, त्यांचेच वेतन होणार आहे. जोपर्यंत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड होत नाहीत, तोपर्यंत त्यांचे पगार रोखले जाणार आहेत.
या मोठ्या प्रमाणातील पडताळणीसाठी सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे. पुढील महिन्यात या कागदपत्रांची तपासणी सुरू होणार असून, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे तीन महिने लागतील, असे समजते.
वाढीव टप्पा अनुदानालाही विलंब
दरम्यान, राज्यातील अंशत: अनुदानित शाळा व तुकड्यांवरील ५१ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केला होता. हा निर्णय ऑगस्टपासून लागू राहील, असे सांगण्यात आले होते. परंतु, सध्या शाळांकडून मागविलेल्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनबिलांत वाढीव टप्पा अनुदानाचा कोणताही उल्लेख नाही.
अंशत: अनुदानित ३,४२७ शाळा आणि १५,५७१ तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ प्रत्यक्षात ऑक्टोबरपासून मिळेल, असे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. त्याआधी सप्टेंबरमध्ये संचमान्यता प्रक्रियेचा टप्पा पूर्ण होणार आहे.
————————————————————————————————-






