कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ज्या संवेदनशील वैचारिक भूमिकेतून आयुष्यात विविध स्थित्यंतरे स्वीकारली, ती पाहता ते एक संवेदनशील बुद्धीवादी असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणसास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार व कार्य’ या विषयावरील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते; तर, ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल प्रमुख उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, वाईसारख्या कर्मठ ठिकाणी तर्कतीर्थांनी केलेले काम ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. वैदिक, मार्क्सवाद, गांधीवाद, काँग्रेस आणि आधुनिक नवविचार अशी वैचारिक स्थित्यंतरे तर्कतीर्थांनी वेळोवेळी अत्यंत जाणीवपूर्वक स्वीकारली. राजकीय सत्तेचा मोह टाळून विश्वकोश निर्मितीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी या कार्याला वाहून घेतले, ही बाबही आजच्या काळासाठी आदर्शवत स्वरुपाची आहे. अनेक प्रसंगी सत्यशोधक, ब्राह्मणेतरांच्या प्रागतिक विचारांशी ते एकरुप झाल्याचीही उदाहरणे आहेत. ज्या काळात जो प्रश्न सामोरा आलेला आहे, त्या काळात तो सोडविण्यासाठी शक्य ते सर्व करण्याची तर्कतीर्थांची भूमिका यामागे दिसून येते. शिवाजी विद्यापीठाने आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून तर्कतीर्थांविषयी ऐतिहासिक दस्तावेजाची निर्मिती झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘...तर्कतीर्थांचे तर्क मात्र तेच राहतील’
ज्येष्ठ निर्माते-दग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी तर्कतीर्थ जोशी यांच्यावर माहितीपट काढला. तर्कतीर्थांची मुलाखत त्यामध्ये समाविष्ट आहे. या माहितीपटाच्या अनुषंगाने तर्कतीर्थांच्या विविध स्वभावपैलूंचे त्यांनी अतिशय नर्मविनोदी शैलीत निवेदन केले. ते म्हणाले, तर्कतीर्थ हे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ होते, हे माहिती होते; पण, त्याच बरोबरीने त्यांनी विनोदबुद्धीही जपली होती, हे या निमित्ताने अनुभवास आले. या मिश्कील स्वभावाबरोबरच शास्त्रीजींमध्ये एक उत्तम नटही दडलेला होता. तो या चित्रपटाच्या निमित्ताने मला दर्शकांसमोर आणता आला, याचे समाधान वाटते. या चित्रीकरणाचा संपूर्ण अनुभव अत्यंत अविस्मरणीय होता, असे त्यांनी सांगितले.
अशा स्वरुपाची परिषद दहा वर्षांनी पुन्हा भरवावी, अशी सूचना करताना पटेल म्हणाले, त्यावेळी तर्कतीर्थांवर बोलणारे वक्ते बदललेले असतील, त्यांची मांडणी बदललेली असेल, समोर बसलेले तरुण श्रोते बदललेले असतील. पिढ्या बदलतील, मात्र तर्कतीर्थांचे तर्क तेच राहतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, तर्कतीर्थांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी ही परिषद म्हणजे एक ज्ञानरुपी तीर्थयात्रा ठरली आहे. या परिषदेने त्यांच्या जीवनकार्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन प्रदान केला आहे. तर्कतीर्थांचा एकेक पैलू समजून घेण्यास आजच्या पिढीने प्राधान्य दिले पाहिजे, याची जाणीव या निमित्ताने करून दिलेली आहे. जब्बार पटेल यांनी ज्या व्यक्तीकेंद्री चित्रपटांची निर्मिती केली आहे, त्यांचा महोत्सव शिवाजी विद्यापीठात लवकरात लवकर भरविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थांविषयी साकार केलेल्या महाप्रकल्पाचीही त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
कार्यक्रमात डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रकाश पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यासह किशोर बेडकीहाळ, डॉ. राजा दीक्षित, डॉ. संजय ठिगळे, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. नागोराव कुंभार, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. नामदेव माळी, डॉ. अविनाश सप्रे, डॉ. जी.पी. माळी, डॉ. विश्वास सुतार, डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह अभ्यासक, संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, परिषदेत दिवसभरात विविध सत्रांमध्ये ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट, गांधीवादी विचारवंत डॉ. विश्वास पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ अभ्यासक श्रीनिवास हेमाडे, ज्येष्ठ विचारवंत सरोजा भाटे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी, प्रख्यात विचारवंत अशोक राणा आणि नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर या विद्वतजनांनी तर्कतीर्थांच्या विविध पैलूंचा वेध घेत परिषदेच्या यशस्वितेवर शिक्कामोर्तब केले.
——————————————————————————————-