जोतिबा डोंगर : प्रसारमाध्यम न्यूज
संपूर्ण महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या जोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या प्राधिकरण प्रक्रियेत जोतिबा ग्रामस्थांना विस्वासात घ्या, अशी मागणी करणारे एक निवेदन जोतिबा ग्रामस्थांच्या आणि मानाच्या गावकरांच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि खासदार धैर्यशील माने यांना देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून २५९. ५९ कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. यामध्ये विविध विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे. या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. प्राधिकरणाची प्रक्रिया सुरु झाल्यापासून आज अखेर जोतिबा ग्रामस्थांना या प्रक्रियेत समाविष्ट करून घेतलेलं नाही.
विविध विकास कामांचे आराखडे तयार करताना ग्रामस्थांची मतं देखील विचारात घेतलेली नाहीत. यामुळे प्राधिकरणाच्या बाबतीत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रक्रियेत गुरव समाजाचे हक्क अबाधित राहणार का ? गावाचे विस्थापन होणार का ? असे काही प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत. या अनुषंगाने आज जोतिबा ग्रामस्थ आणि मानाचे गावकरी यांच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि खासदार धैर्यशील माने यांना एक निवेदन देण्यात आले.
सन १९९१ – ९२ मध्ये राबवण्यात आलेल्या सुंदर जोतिबा परिसर समितीच्या विकास कामात ग्रामस्थांना विचारात न घेतल्याने काही योजनांचा बोजवारा उडाला आहे. या गोष्टींचा विचार करून प्राधिकरणाच्या प्रक्रियेत जोतिबा ग्रामस्थांना विश्वासात घ्या, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी दिनांक ५ जून रोजी जोतिबा ग्रामस्थ, जिल्हाधिकारी आणि खासदार यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिले. यावेळी जयवंत शिंगे, सुनिल सांगळे, तुषार झुगर, संतोष ठाकरे, गणेश चौगले, अमोल शिंगे आदी उपस्थित होते.
————————————————————————————————