Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे बांगलादेश आता स्पर्धेत सहभागी होणार नाही, तर स्कॉटलंड गट ‘क’ मधून खेळताना दिसणार आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेशचा समावेश गट ‘क’ मध्ये होता. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतातील सामने श्रीलंकेत स्थलांतरित करण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. ही मागणी आयसीसीकडून फेटाळण्यात आली. त्यानंतर बांगलादेश सरकारच्या निर्णयाचा हवाला देत बीसीबीने भारतात सामने खेळण्यास नकार दिला.

स्कॉटलंडचे सामने भारतात

 स्कॉटलंडचे चार सामने भारतात होणार आहेत. त्यापैकी तीन सामने कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवले जातील. स्कॉटलंडचा सामना वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंडविरुद्ध कोलकात्यात होणार आहे. तर, 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत स्कॉटलंड विरुद्ध नेपाळ हा सामना खेळवला जाणार आहे.

बांगलादेशला मोठा आर्थिक फटका

आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला अंतिम निर्णयासाठी 24 तासांची मुदत दिली होती. मात्र, बांगलादेश सरकारने भारतात सामने न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे बीसीबीने स्पष्ट केले. यानंतर आयसीसीने अधिकृतपणे स्कॉटलंडला संधी दिली.

भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप न खेळल्यामुळे बांगलादेशला सुमारे 300 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. अनेक माजी खेळाडूंनी बांगलादेश सरकार आणि क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावर टीका केली आहे.

वादाची पार्श्वभूमी

बांगलादेशात दोन हिंदू तरुणांच्या हत्येनंतर भारतात विरोधाचे सूर उमटले होते. याच काळात आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजूर रहमानला 9.20 कोटी रुपयांना संघात घेतले होते. मात्र, बीसीसीआयच्या निर्देशानुसार केकेआरने मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने तातडीची बैठक घेऊन टी-20 वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेत घेण्याची भूमिका मांडली होती. मात्र, लॉजिस्टिक, हॉटेल बुकिंग आणि अन्य व्यवस्थांमुळे बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here