कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
तसं बघायला गेलं तर कोल्हापूर ने आपल्या कोल्हापुरी संस्कृती ची दखल जागतिक पातळी वरती घ्यायला भाग पाडली आहे. अनेक कर्तृत्व गाजवणारी मंडळी या कोल्हापूरच्या लाल मातीत निपजली आहेत. कोल्हापुरी खाद्य संस्कृती असो की, कला, क्रीडा, उद्योग, राजकीय क्षेत्र सगळीकडे काही ना काही चांगल नाव कोल्हापूरच्या रांगड्या माणसाने कमावले आहे. ते म्हणतात ना, जसा राजा तशी प्रजा ही म्हण या कोल्हापूर साठीच बनवली असेल असे मला वाटते. कारण, कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी कोणते असे क्षेत्र सोडले नसेल जिथे त्यांचे उच्च कोटीचे कर्तृत्व नसेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल पद्धती ही देशात त्यांनीच प्रथम आणली. राधानगरी धरणाच्या बांधकामासाठी स्वतःचा खजिना रिता केला. कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा पंचगंगा नदीवर कसबा बावडा येथे १९२८ साली छत्रपती राजाराम महाराजांनी बांधून बेंचमार्क स्थापन केला. कोल्हापूरचे खाशाबा दादासाहेब जाधव हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिकपदक विजेते होते. असे कित्येक कर्तृत्वान लोक इथे जन्मले. प्राचीन काळापासूनच कोल्हापूरचे मोठे महत्व आहे. त्यात करवीर महात्म्य या ग्रंथात कोल्हापूरचे आध्यात्मिक महत्वही नमूद केले असून, या पुण्य पवित्र भूमीला भेट देण्यासाठी खुद्द स्वामी विवेकानंद ही येऊन गेले होते. पण, ही गोष्ट हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच लोकांना माहीत आहे. त्याचे पुरावे सुद्धा आहेत. याच पुराव्याना न्याय देण्यासाठी आपल्या कोल्हापूरचे सुपुत्र आणि कोल्हापूर पोलीस दलामध्ये हवालदार या पदावर कार्यरत असणाऱ्या श्री. राहुल विश्वनाथ माळी यांनी प्रयत्न केले आहेत. आपले कर्त्यव्य बजावत असताना वेळ काढून आपल्या जन्मभूमीच्या कौतुकासाठी अनेक भेटीगाठी घेऊन संशोधन करून स्वामी विवेकानंद यांची कोल्हापूर भेट व त्यांच्या आठवणी पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केल्या आहेत. त्याचा थोडक्यात आढावा…
………. दिग्विजय माळकर
स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान : पुस्तकाचा परिचय लेखक श्री राहुल विश्वनाथ माळी यांच्याच शब्दात
आपल्या बुद्धीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात अधिराज्य गाजवण्याची क्षमता असूनही सर्वस्वाचा त्याग करीत ऐन तारुण्य वयाच्या २३ व्या वर्षी संन्यस्त जीवनाचा स्वीकार करून आपली तहहयात अखिल मानवजातीच्या उत्थानासाठी अर्पण करणारे श्रेष्ठतम व्यक्तिमत्व म्हणजे ‘स्वामी विवेकानंद’ विवेकानंद प्रत्यक्ष जागतीक पटलावर अवतरले ते ११ सप्टेंबर १८९३ च्या शिकागो सर्व धर्म परिषदेतील भाषणाने. या भाषणाने त्यांना एक अशी ओळख निर्माण करून दिली जी सृष्टीच्या अखेरपर्यंत पुसली जाऊ शकत नाही.
शिकागो सर्व धर्म परिषदेला जाण्या अगोदर अडीच वर्षे त्यांनी भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जे भ्रमण केले ते त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी तितकेच फलदायी ठरले जितके गुरू रामकृष्णांनी केलेले मार्गदर्शन. या भ्रमणादरम्यान ते कोल्हापूर शहरात देखील आले होते हे आपल्यासाठी भाग्याचे द्योतकच म्हणावे लागेल. मात्र त्यांच्या इथल्या वास्तव्याबाबत कित्येक लोक अजूनही अनभिज्ञ आहेत हेही तितकेच खरे. मग, ते इथे कसे आले असतील ? त्यांची इथली व्यवस्था कोणी केली असेल ? कशी केली असेल ? इथे काय काय घटना घडल्या असतील ? या आणि अशाच तत्सम प्रश्नांच्या उत्तरांपासून तर ते फारच लांब. अशा प्रश्नांचा मागोवा घेत असताना नावारूपाला आले एक पुस्तक ‘स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान’ जे एप्रिल २०२३ मध्ये प्रकाशित झाले आहे. तीन वर्षांच्या अथक परिश्रमातून, संशोधनात्मक अभ्यासातून निर्माण झालेल्या या पुस्तकातील प्रत्येक मुद्द्द्याला लिखीत संदर्भ आहे हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य.
१८९० च्या अखेरीस विवेकानंद कोलकात्यातून बाहेर पडून बिहार-उत्तराखंड-दिल्ली-राजस्थान-गुजरात असे भ्रमण करत महाराष्ट्रात आले. मुंबईमध्ये दोन महिने त्यांनी शेठ छबिलदासांकडे वास्तव्य केले तर पुण्यात आठ ते दहा दिवस लोकमान्य टिळकांकडे. तेथून ते महाबळेश्वरला गेले आणि महाबळेश्वरहून ऑक्टोबर १८९२ मध्ये कोल्हापूरला आले. पुण्यातील वास्तव्यादरम्यान ते न्या. महादेव गोविंद रानडेंच्या संपर्कात आले आणि त्यांनी स्वामीजींना कोल्हापूर संस्थानचे खाजगी कारभारी लक्ष्मण रामचंद्र गोळवलकर यांच्या नावे एक परिचय पत्र दिले. तसेच ते गुजरात मध्ये भ्रमण करत असताना भावनगरच्या राजांनीही त्यांना कोल्हापूर संस्थानच्या नावे एक परिचय पत्र दिले होते.
भावनगरच्या दरबारातील व न्या. रानडे यांच्याकडील परिचय पत्र म्हणजे दोन्हीही पत्रे प्रतिष्टीतांची त्यामुळे कोल्हापूर दरबारातील खाजगी कारभारी लक्ष्मण गोळवलकर यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था खास राजघराण्यातील व्यक्तींसाठी राखून ठेवलेल्या खासबागेत केली. त्या वेळी खासबागेत तीन इमारती होत्या ज्यापैकी आज एकही अस्तित्वात नाही. मात्र त्या इमारतींची नेमकी जागा कोठे होती आणि त्या दिसायला कशा होत्या याचा सविस्तर आढावा या पुस्तकात तत्कालीन कागदपत्रे, नोंदी, नकाशे यांच्या आधारे उत्तमरित्या पहिल्यांदाच समोर आणला आहे हे विशेष उल्लेखनीय म्हणता येईल.
राजाराम महाविद्यालयातील प्रा. विष्णू गोविंद विजापूरकरांच्या कानावर ज्या वेळी ‘गोळवलकरांकडे कोणी इंग्रजी बोलणारा भव्य संन्यासी आला आहे’ अशी बातमी आली त्या वेळी ते तातडीने त्यांची भेट घ्यायला खासबागेत आले. स्थानिक लोकांशी चालेले त्यांचे संभाषण पाहून विजापूरकर चांगलेच प्रभावित झाले आणि त्यांनी दुस-याच दिवशी त्यांना ‘राजारामीय क्लब’ मध्ये व्याख्यानासाठी बोलावले. ‘राजारामीय क्लब’ हा ‘राजाराम महाविद्यालचाच’ एक उपक्रम होता ज्याचे कार्य व कर्म ठिकाण महाविद्यालयाचे मुख्य सभागृह होते. या व्याख्यानाबाबत वर्णन करताना विजापूरकर म्हणतात, “उपस्थित २५ पंचवीस मंडळींचे मिळून भाषण १० मिनीटे झाले तर स्वामीजींनी तास दिडतास दिलेले भाषण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.” या व्याख्यानातील आशय व कोल्हापूरातील विवेकानंदांच्या इतर आठवणी आपल्याला वाचायला मिळतात त्या विजापूरकरांनी चालविलेल्या ‘ग्रंथमाला’ या मासिकातील ‘जुलै १९०२’च्या अंकात. ४ जुलै १९०२ रोजी विवेकानंदांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या कोल्हापूर भेटीतील आठवणींना उजाळा देण्यासाठी विजापूरकरांनी त्यांच्या मासिकात ‘ब्रह्मीभूत विवेकानंद’ हा श्रद्धांजलीपर लेख लिहीला जो विवेकानदांच्या कोल्हापूर भेटीतील महत्वाचा ऐवज आहे.
कोल्हापूरमधून बाहेर पडताना विवेकानंदांना लक्ष्मण गोळवलकरांनी त्यांचे बेळगाव मधील मित्र सदाशीव भाटे यांच्या नावे एक परिचय पत्र दिले. भाटेंच्या घरी तीन दिवस राहिल्यानंतर ते हरिपद मित्र या फॉरेस्ट ऑफिसरांच्या घरी आठ दिवस राहिले. सदाशिव भाटेंचा मुलगा गणेश भाटे व हरिपद मित्र यांच्या आठवणींतून विवेकानंदांचा कोल्हापूर राजघराण्याशी आलेला संपर्क उजेडात येतो. आणखी एक महत्वाची घटना म्हणजे २६ ऑक्टोबर १८९२ रोजी हरिपद मित्रांनी विवेकानंदांना विनंती करून त्यांचे एक छायाचित्र काढून घेतले ज्या छायाचित्रात त्यांनी ‘कोल्हापुरी चप्पल’ परिधान केलेले दिसते. कोल्हापूरच्या दृष्टीने ही फारच अभिमानाची आणि गौरवास्पद गोष्ट म्हणावी लागेल. हे छायाचित्र तसेच प्रा. विष्णू गोविंद विजापूरकर, प्रा. गणेश सदाशिव भाटे आणि हरिपद मित्र यांनी लिहिलेल्या सविस्तर आठवणी या पुस्तकात समाविष्ट असल्याने वाचकांची जिज्ञासा आपोआप शमूण जाते हे नक्की.
राजर्षी शाहू म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे राजर्षी शाहू असे एक समीकरण बनले आहे, तेव्हा छत्रपती शाहू आणि विवेकानंदांची कोल्हापूर येथे भेट झाली का ? या ब-याच वर्षापासून अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नाच्या उत्तरापाशी हे पुस्तक आपल्याला ससंदर्भ घेऊन जाते हे विशेष. तसेच विवेकानंदांच्या कोल्हापूर संबंधातील इतरही काही घटना आहेत ज्या प्रथमच लोकांसमोर येताना दिसतात. एकूणच काय तर, इतिहास संशोधन कसे करावे, एकाला एक धागा कसा पकडत जावा आणि संदर्भासहित विषयाची मांडणी कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान’ हे पुस्तक.
पुस्तकाचे नाव – स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान- स्वामीजींच्या कोल्हापूर भेटीचा मागोवा
संशोधन आणि लेखन – राहुल विश्वनाथ माळी, कोल्हापूर