प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

बेलूर मठाच्या पवित्र मातीत गुरुबंधूंच्या प्रेमाचे आणि अद्वैताचे अनेक सोहळे रंगले, पण हा प्रसंग मनाचा ठाव घेणारा आहे. स्वामी विवेकानंदांचे धाकटे गुरुबंधू स्वामी विज्ञानानंद मठाच्या बांधकामात व्यस्त होते. तितक्यात तिथे स्वामीजींचे आगमन झाले. जणू एखादा तेजस्वी सूर्यच तिथे अवतरला!
गप्पांच्या ओघात सहजपणे विज्ञानानंदजींच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, ज्यात तक्रार कमी आणि एक अगतिक शंका जास्त होती. ते म्हणाले, “नरेंद्र दादा, तुम्ही तर गुरुदेवांच्या शब्दांना हरताळ फासलात! तुम्ही त्यांच्या शिकवणुकीच्या अगदी उलट वागलात.”
स्वामीजींच्या नजरेत एक तीक्ष्ण चमक आली. त्यांनी विचारले, “विज्ञाना, काय म्हणायचे आहे तुला? स्पष्ट बोल.”
विज्ञानानंदजी गहिवरून म्हणाले, “ठाकूर नेहमी म्हणायचे की कामिनी-कांचनचा स्पर्शही करू नका. पण तुम्ही तर सातासमुद्रापार त्या स्त्रियांच्या सहवासात राहिलात, त्यांच्याच घरी वास्तव्य केले …पैशाला स्पर्श केला ..हे गुरुआज्ञेचे उल्लंघन नाही का? हे का केलेत तुम्ही?”
हे ऐकताच स्वामीजींचा चेहरा रागाने तांबारला. तो राग कसा होता इथे शब्दांमध्ये व्यक्त करणे मला थोडंसं कठीण आहे कारण तो राग ज्यांना आला होता ते योगी व्यक्ती होते , तर आपल्या गुरुनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची ती एक वेदना होती. स्वामीजींचा तो आवेश पाहून विज्ञानानंदजी घाबरले आणि धावत जाऊन स्वामी ब्रह्मानंदजींच्या कुशीत शिरले. “महाराज, वाचवा मला! आता नरेंद्र दादा मला सोडणार नाहीत!”
ब्रह्मानंदजींनी पाहिलं की स्वामीजींचा श्वास वेगाने चालला आहे. त्यांनी शांतपणे स्वामीजींचा हात धरला आणि मायेने म्हणाले, “नरेंद्र, अरे तो लहान आहे. त्याचं मन अजून बाळबोध आहे. तुला तर ठाकूर ठाऊक आहेतच ना? आपल्या या लहान भावाला माफ कर.”
‘ठाकूर’ आणि ‘ब्रह्मानंद’ (राखाल) यांचे शब्द कानी पडताच स्वामीजींचा राग बर्फासारखा विरघळला. त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी विज्ञानानंदजींना जवळ बोलावले. त्यांचा आवाज आता रागीट नव्हता, तर त्यात एक करुण आर्तता होती.
विज्ञानानंदजींच्या डोक्यावर हात ठेवत स्वामीजी भावूक होऊन म्हणाले:
” अरे, ठाकूरांनी तुम्हाला जे सांगितले, ते तुमच्या कल्याणासाठी होते तो आदेश व्यक्तिशः तुम्हाला होता…. पण माझ्यावर त्यांची वेगळीच कृपा झाली रे! त्यांच्या स्पर्शाने माझ्या हृदयातील, माझ्या दृष्टीतील स्त्री-पुरुष हा भेदच कायमचा जळून खाक झाला आहे. आता मला समोर कोणी स्त्री दिसत नाही की पुरुष… मला दिसते ती फक्त माझ्या गुरुदेवांची चैतन्यमयी लेकरं आणि चिद विलासात नृत्य करणारी भगवती जगदंबा ! मी जे काही केलं, ते त्या माऊलीच्या इच्छेनेच केलं. माझ्या दृष्टीने आता संपूर्ण जगच ‘ब्रह्ममय’ झालंय!”
हे ऐकून विज्ञानानंदजींचे डोळे भरून आले. त्यांना उमजले की, ज्याने स्वतःचे अस्तित्व गुरुचरणी विलीन केले आहे, त्याला जगाचे नियम लागू होत नाहीत.
याच निष्ठेबद्दल थोर गिरीशचंद्र घोष एकदा म्हणाले होते “लोकांना वाटतं नरेंद्र चुकत असेल, पण माझा त्याच्यावर इतका विश्वास आहे की, जर मला कधी त्याच्यात दोष दिसला, तर मी समजेन की माझ्याच डोळ्यांना मोतीबिंदू झालाय. कारण माझा नरेंद्र म्हणजे शुद्धतेचा साक्षात अवतार आहे!” थोडक्यात काय तर ज्याचं मन आरशासारखं स्वच्छ असतं, त्याला जगही तितकंच पवित्र दिसतं. स्वामीजींची ही ‘अभेद’ दृष्टीच त्यांच्या महानतेचे खरे रहस्य होते.





