प्रसारमाध्यम डेस्क
आज सुरेश भट यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणीना उजाळा…
………………………………………………..
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर एका चित्रपटाची निर्मिती करत होत्या…! त्या चित्रपटासाठी त्यांना एक खास.., वजनदार असे गाणे हवे होते..! त्यांनी त्या साठी कै. श्री. सुरेश भटांना विचारले…!
सुरेश भट म्हणजे एकदम तब्बेतीचे कवी..,एक मस्त.., कलंदर व्यक्तीमत्व.., सिनेमाच्या गाण्यांचा रतीब घालणारे…! ऑर्डर प्रमाणे बुंदी पाडून देणारे कोणी ‘नाना’ नव्हते ते…!
जयश्रीताईंची विनंती मानून श्री. सुरेश भट असे एखादे गीत लिहिण्यास तयार झाले..! “माझी मुंबईत राहण्या खाण्याची सोय करा.., म्हणजे मी मुंबईत येऊन तुम्हाला गाणे लिहून देईन..!”
जयश्रीताई त्याला तयार झाल्या…., कविवर्य मुंबईत दाखल झाले..!
सौ. जयश्रीताई.., चित्रपटाचे कथा आणि पटकथाकार, संगीतकार आणि सुरेशभाऊ यांच्यात काही बैठका झाल्या..!
आता जयश्रीताई गाणे कधी हातात पडते याची वाट पाहू लागल्या..!
पण सुरेशभाऊंकडून काही गाणे लिहून होईना..!
काही दिवस थांबून जयश्री ताईंनी सुरेश भाऊंना आठवण करुन दिली..!
“हो जाये गा.., मिल जायेगा..!” सुरेशभाऊंचे उत्तर आले…!
बाईंनी विचार केला मोठे कवी आहेत…, थांबू काही दिवस…, पण असेच आणखी काही दिवस गेले…, गाणे काही भेटेना…!
इकडे त्या गाण्यासाठी चित्रीकरण खोळंबले..! स्टुडिओच्या तारखांबद्दल प्रश्न निर्माण व्हायला लागले..!
जयश्रीताईंचा धीर सुटला.., आता सुरेश भाऊंना तगादे चालू झाले…! पण…,”हो जाये गा…, मिल जायेगा..!” हेच उत्तर मिळत राहिले…!
इकडे गाणे न मिळाल्याने कामे खोळंबली होती… तर तिकडे सुरेश भाऊंचा लॉज व जेवणा खाण्याच्या खर्चाचे बिल दिवसागणीक वाढत होते..! अखेर बाईंनी सुरेश भाऊंना स्पष्ट सांगितले…!
“सुरेश भाऊ आता आपल्याला जास्त वाट पाहता येणार नाही.., नाही गाणे सुचत तर राहू दे…!
पुन्हा कधी तरी बोलवू आम्ही आपल्याला….! आम्ही पुढच्या दोन दिवसाचे लॉजचे सगळे बिल भरले आहे..!
पण याहून जास्त आपल्याला तिथे राहाता येणार नाही..! तेव्हा…,”
“ठीक आहे, जशी तुमची मर्जी..!” सुरेशभाऊ शांतपणे म्हणाले..!
दुसरे दिवशी त्या लॉजच्या मालकांचा जयश्री ताईंना फोन आला..! “आपले ते नागपूर चे गेस्ट.., अगदी आत्ताच खोली खाली करुन गेले…! गडबडीत दिसले.., दादर ला नागपूरची ट्रेन पकडायची आहे असे काही तरी म्हणत होते…!”
बाईंना आश्चर्य वाटले.., कविवर्य रागावले का काय…? असे न सांगताच…,
न कळवताच कसे मुंबई सोडून निघाले…? छे.. छे..,आपल्या बोलण्याने दुखावला वाटतो हा मानी गृहस्थ..!
असे व्हायला नको होते.., त्यांनी तडक दादर स्टेशन गाठले..! नागपूरची गाडी उभी होती.., सुरेशभाऊ निवांत खिडकीची जागा पटकावून बसले होते..!
बाईंनी त्यांना विचारले…, त्यांची माफी मागितली.., सुरेशभाऊ नुसतेच हसले…, गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला..!
“हे घ्या आपले गाणे..! आपली व्यावहारिक अडचण मला समजते जयश्रीताई.., पण त्याचे काय आहे…, काव्य ही एक दैवी देणगी आहे..! प्रतिभेचा हुंकार आहे.., याला काळ.., काम.., वेगाची बंधने लागू पडत नसतात.., सुचले तर आत्ता लगेच नाही तर जेव्हा सुचेल तेव्हा असे हे काम असते…!
आज भल्या पहाटेच हे गाणे सुचले मला.., हातासरशी लिहून टाकले…!” “याच्या मानधनाचा चेक आपल्याला पाठवून देते…, लगेचच…!”
“ताई…, त्याची काहीच गरज नाही…! आपण माझी मुंबईत जी बडदास्त ठेवलीत तीच मला पावली..! बाकी गाणे म्हणाल तर ते सरस्वतीचे वरदान आहे.., परमेश्वरी देन आहे.., त्याचे मोल मी काय करणार आणि तुम्ही काय देणार’..?’
“अहो पण..?”
“तुम्ही आता काही बोलू नका…, उलट मीच तुमची क्षमा मागितली पाहिजे.!”
एव्हढ्यात गाडी हलली…,
जयश्रीताईंना पुढचे काही बोलता आले नाही…! घरी परत आल्यावर जयश्रीताईंनी ते गाणे वाचले मात्र, त्यांच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रूंच्या धारा लागल्या..! काही कारणामुळे ते गाणे त्यांच्या त्या चित्रपटात वापरता आले नाही..!
ते तसेच त्यांच्यापाशी पडून राहिले… पुढे काही वर्षांनी जेव्हा श्री. जब्बार पटेल एक चित्रपट निर्माण करत होते.. तेव्हा त्या चित्रपटाचे संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांना अगदी असेच गाणे हवे होते, कोठून तरी त्यांना त्या सुरेश भटांच्या गाण्याबद्दल कळले…,
त्यांनी सुरेशभाऊंना विचारले…?
“वो गाना…? वो तो अब “जयश्रीताई जीं” की अमानत हैं…! उन्हीसे बात किजीये..!”
जयश्रीताईंनी त्या गाण्यासाठी तसे म्हटले तर बराच खर्च केला होता पण…,”हे गाणे तर परमेश्वरी कृपाप्रसाद आहे..!
मी याचे पैसे नाही वसूल करणार.., उलट पं. हृदयनाथजींसारख्या संगीतकारा कडे हे गाणे जाते आहे.., त्याचे खरोखरीचे चीज होईल.., हिर्याला कोंदण लाभेल..!” असे म्हणत ते गाणे पं. हृदयनाथजींकडे हवाली केले..!
अर्थातच पं. हृदयनाथजींनी त्या हिर्याला साजेसे असे सुरेख कोंदण दिले.., आणि ते गाणे मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर केले..,
ते हेच गाणे होते…!
*********
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..,
तुझेच मी गीत गात आहे..!
अजुन ही वाटते मला की.,
अजुन ही चांद रात आहे..!
कळे ना मी पाहते कुणाला..?
कळे ना हा चेहरा कुणाचा..?
पुन्हा पुन्हा भास होत आहे..,
तुझे हसू आरशात आहे..!
सख्या तुला भेटतील माझे..,
तुझ्या घरी सूर ओळखीचे..!
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा..,
अबोल हा पारिजात आहे..!
उगीच स्वप्नांत सावल्यांची..,
कशास केलीस आर्जवे तू..?
दिलेस का प्रेम तू कुणाला..?
तुझ्याच जे अंतरात आहे..!
**********
गीत -: सुरेश भट..
स्वर -: लता मंगेशकर..
संगीत -: पं. हृदयनाथ मंगेशकर
—————————————————————————————————————————–