कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, स्मिता वाघ या खासदारांसह महाराष्ट्रातील ७ तर देशातील १७ खासदारांना २०२५ चा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सात खासदारांपैकी हा पुरस्कार जाहीर झालेल्या चार महिला खासदार आहेत. प्राईम पॉईंट फाऊंडेशन या संस्थेद्वारे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्या खासदारांना दरवर्षी ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. या संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्र यावर्षीही आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील खासदार- स्मिता वाघ (भाजप), मेधा कुलकर्णी (भाजप), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), श्रीरंग बारणे (शिवसेना), नरेश म्हस्के (शिवसेना), अरविंद सावंत (शिवसेना- उबाठा) आणि वर्षा गायकवाड (काँग्रेस) या सात खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार, २०१० मध्ये प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्स यांनी संसद रत्न पुरस्कारांची स्थापना केली. मे २०१० मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटनही डॉ. कलाम यांनी केले होते. उल्लेखनीय म्हणजे, श्री हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते.
प्रतिष्ठित पुरस्कार विजेते संसद सदस्य आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली ज्युरी समिती खासदारांच्या वर्षभरातील संसदेतील कामकाजाची माहिती घेऊन संसदरत्न पुरस्कारासाठी नावे सुचविते. ही माहिती लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांच्या अधिकृत नोंदी तसेच पीआरएस कायदेविषयक संशोधनातून मिळवली जाते.