कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मराठी भावसंगीत, भक्तिगीत आणि चित्रपट संगीताच्या आकाशात गेली अनेक दशके तेजस्वीपणे झळकणारा सूर्य म्हणजे रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके. ‘बाबूजी’ या नावाने परिचित असलेले हे मराठी संगीतविश्वातील अजरामर व्यक्तिमत्त्व आज त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सन्मानाने आठवले जात आहे.
गीतरामायण
कवी ग. दि. माडगूळकर लिखित गीतरामायण हे बाबूजींच्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान गाठणारे आणि त्यांना जनमानसात अढळ स्थान मिळवून देणारी कलाकृती ठरली. १९५५-५६ मध्ये आकाशवाणीवर दर रविवारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेतील सर्व ५६ गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आणि बहुतांश गाणी स्वत: गायली सुद्धा.
या गाण्यांनी मराठी रसिकांच्या हृदयाला साद घातली आणि आजही स्टेजवरचे गीतरामायण सादरीकरण हे रसिकांसाठी पर्वणीच ठरते. बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात सुमारे १८०० प्रयोग देश-विदेशात केले.
गीत रामायणाची अनेक भाषांमधील ओळख
गीतरामायणाची लोकप्रियता केवळ मराठीत मर्यादित राहिली नाही. आजवर या महान कृतीचे हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत आणि कोकणी अशा अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. विशेष बाब म्हणजे या सर्व भाषांतरांमध्ये बाबूजींनी दिलेल्या मूळ चाली आणि गदिमांच्या अर्थात अगदी एका मात्रेचाही फरक झाला नाही. ही बाब त्याच्या कालातीततेचा आणि सांगीतिक ताकदीचा पुरावा आहे.
१९१९ मध्ये कोल्हापुरात जन्मलेल्या सुधीर फडके यांनी कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. १९४१ मध्ये HMV मध्ये गायक म्हणून सुरुवात केल्यानंतर १९४६ मध्ये त्यांनी ‘प्रभात फिल्म कंपनी’ मध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले आणि गाणी गायली.
त्यांच्या काही अजरामर गाण्यांमध्ये ‘दूर देशी चाललास’, ‘घनश्याम सुंदर’, ‘सखू सासरपाणी’, ‘कसा मी शिपाई’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
‘वीर सावरकर’ या चित्रपटासाठी संगीत देताना बाबूजींनी आपल्या देशभक्तीपर जाणिवांनाही स्वर दिला.
सन्मान आणि गौरव
त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले
-
राष्ट्रपती पदक (१९६३) – ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटासाठी
-
दिनानाथ मंगेशकर पुरस्कार ( १९९८)
-
लता मंगेशकर पुरस्कार ( २००१ )
-
अल्फा जीवन गौरव पुरस्कार ( २००१ )
-
सह्याद्री स्वररत्न पुरस्कार ( २००२ )
-
अमर गायकीची अमर आठवण
जुलै २९, २००२ रोजी बाबूजींचं निधन झालं, पण त्यांच्या गाण्यांचा स्वर अजूनही प्रत्येक मराठी मनात रुंजी घालत आहे. त्यांच्या गीतांनी फक्त मनोरंजन नाही, तर संस्कृती, श्रद्धा, परंपरा आणि आत्मिक समाधानही दिलं.
आज त्यांच्या १०६ व्या जयंती निमित्त राज्यभरात भावगीत संध्या, गीतरामायणाचे सादरीकरण, वक्तृत्व आणि अभिवाचन कार्यक्रमांद्वारे ते आठवणीत राहिले आहेत. स्वरांची ज्योती अढळ ठेवणारा हा ‘ बाबूजी ’ आजही आमच्या हृदयात जिवंत आहे…
आमच्या यू ट्यूब चॅनेलला भेट द्या….👇