कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पाऊस चांगला व सर्वच भागात असेल तर याचा कृषी क्षेत्रासह अन्य क्षेत्रात अनुकूल परिणाम होतो. भारतीय हवामान विभागाने यंदा देशात सामान्यपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, अन्नधान्य बरोबरच अन्य क्षेत्रातील महागाई कमी राहण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ आणि क्रिसिल या रेटिंग एजन्सीने व्यक्त केले आहे. अन्नधान्याच्या पुरवठ्यातील स्थैर्यामुळे देशातील उपभोक्ता किंमत निर्देशांकावर होणारा दबाव काहीसा कमी होऊ शकतो.
एका ताज्या आर्थिक अहवालानुसार, अन्नधान्याच्या किंमती नियंत्रित राहिल्यास बिगर-अन्नधान्य क्षेत्रातही महागाईचे प्रमाण तुलनेने कमी राहू शकते. परिणामी, एकूण चलनवाढ नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.
ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) ही रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण ठरविण्याच्या प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानली जाते. यामुळे येत्या पतधोरण आढाव्यात, रिझर्व्ह बँक रेपो दर स्थिर ठेवण्याची किंवा काहीसा कपात करण्याची शक्यता काही अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सध्या रिझर्व्ह बँक महागाईच्या पातळीवर बारीक नजर ठेवून आपले पतधोरण ठरवत आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा चांगला परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी अन्नधान्याची स्थिरता ही अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे.
——————————————————————————-