पुणे : विशेष प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामी होत्या. या पारंपरिक वारीत यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग करण्यात आला. पुणे पोलिसांनी गर्दीचे अचूक मोजमाप करण्यासाठी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला. एआय कॅमेऱ्यांच्या साहाय्याने मिळालेल्या आकडेवारीनुसार, माऊलींच्या पालखीसोबत २ लाख ९५ हजार वारकरी तर तुकोबांच्या पालखीसोबत १ लाख ९५ हजार वारकरी पुण्यात दाखल झाले.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, “ वारीमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे व्यवस्थापनासाठी अचूक आकडेवारी मिळणे गरजेचे असते. यंदा पहिल्यांदाच एआय कॅमेरे आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन गर्दीचे मोजमाप करण्यात आले, ज्यातून अचूक चित्र समोर आले आहे.”
दिवे घाट पार करत पालख्या पंढरपूरकडे
दोन दिवस पुण्यात मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी दिवे घाट पार करून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. रविवारी रात्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामी होती. सोमवारी सकाळी लोणी काळभोर मधून पालखीने यवतच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
हवेली तालुक्यात उत्साहात स्वागत
लोणी काळभोर येथे हवेली तालुक्यातील जनतेने मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले. पारंपरिक वाद्यांचा गजर, रांगोळ्या, पुष्पवृष्टी आणि भजन-कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
एआय तंत्रज्ञानामुळे व्यवस्थापन सुलभ
पुण्यातील विश्रांतवाडी, संचेती चौक, गुडलक चौक, भैरवनाथ मंदिर, गाडीतळ आणि दिवे घाट या प्रमुख ठिकाणी एआय कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामधून गर्दीची अचूक नोंद घेता आली. पोलिस आणि प्रशासनासाठी ही माहिती महत्त्वाची ठरली आहे.
तंत्रज्ञान आणि भक्तीचा संगम
वारीसारख्या लाखोंच्या उपस्थितीत होणाऱ्या मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. यंदाचा प्रयोग यशस्वी ठरल्याने पुढील वर्षी देखील अधिक व्यापक पद्धतीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार प्रशासन करत आहे.
पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या पालख्या, हजारोंच्या संख्येने चालणारे वारकरी आणि त्यांचा हरिनामाचा गजर हे चित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरले. भक्ती, परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम यानिमित्ताने पाहायला मिळाला.
———————————————————————————