कोल्हापूर : कृष्णात चाैगले
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावचा बिरदेव डोणे ५५१ व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली. या परिक्षेचा निकाल लागला त्यावेळी बिरदेव कर्नाटकातील बेळगाव येथे बकरी चारण्यात रमून गेला होता. खडतर परिश्रम, जिद्द चिकाटी ठेवून नियमित पुस्तकाचे वाचन व अभ्यासातील सातत्यामुळे त्याने यशाला गवसणी घातली आहे. आता ही निकाल लागल्यावर जो तो त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या कडे जातो त्यावेळी तो मेंढी माऊलींच्या कळपातच रमलेला असतो. त्याच्या हा प्रवास जाणून घेऊया…
प्रचंड जिद्द, प्रयत्नांची पराकाष्टा आणि चिकाटीच्या जोरावर यमगे (ता.कागल ) येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे या युवकाने केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होवून आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवलेच त्याचा आनंद कुटूंबासमवेत बेळगाव जिल्ह्यात मेंढरं राखत साजरा केला. सध्या बिरदेव हा बेळगाव जिल्हयातील खानापूर परिसरातील रानावनामध्ये आपल्या आई वडीलांसोबत बकरी घेवून आहे. त्याच ठिकाणी त्याला ही गोड बातमी समजली.आपण आयपीएस उत्तीर्ण होणार याची खात्री होती. त्यामुळे परत मेंढरामध्ये जाता येणार नाही म्हणून तो चार दिवसापूर्वीच कर्नाटकात गेला आहे. एका मेंढपाळाच्या मुलग्याने अवघ्या २७ व्या वर्षी उच्चपदस्थ अधिकारी पदावर मोहर उमटवली आहे. आणि तो कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी ठरला आहे.
केंद्र शासनाने २०२४ मध्ये घेतलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थितीत त्या मित्र परिवाराने जल्लोष केला. यमगे येथे त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार असून त्यासाठी ची तयारी सुरु झाली आहे. बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदीर या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झाले.उच्च माध्यमिक शिक्षण त्याने मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले.आणि इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सीओईपी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतली. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाठी त्याने थेट देशाची राजधानी गाठली. बिरदेवने दिल्लीमध्ये आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरु ठेवले. याठिकाणी त्याने दिवसातील २४ तासामधील सर्वाधिक वेळ त्याने अभ्यास करण्यात खर्ची घातला. तर विरंगुळा म्हणून तो कायकिंग चा छंद जोपासत होता. दिलीमध्ये नेक्सष्ट आयएएस आणि वाझराम क्लासेस याठिकाणी परीक्षेसंबधीचे मार्गदर्शन घेतले.आणि परिक्षेची तयारी केली. व काही ही झाले तरी आयपीएस व्हायचेचं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेल्या बिरदेव ने यशाला गवसणी घातली.
बिरदेव दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करत होता. महिन्याला दहा-बारा हजार रुपये त्याला खर्चासाठी पाठवणे वडिलांना कठीण होत चालले होते. त्यामुळे हा नाद सोड आणि एखादी नोकरी कर असा तगादा वडिलांनी बिरदेव कडे लावला होता. मात्र, आपण आयपीएस परीक्षेत यशस्वी होणारच ही जिद्द बिरदेव ने बोलून दाखवली होती. आणि आज ते खरे ठरले. त्यामुळे कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
….
गणितात शंभर पैकी शंभर गुण…
बिरदेव तसा सुरुवातीपासूनच हुशार, दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये तो मुरगूड केंद्रात प्रथम आला होता. तर गणित विषयात त्याने या दोन्ही परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते. पाचवीमध्ये शिकताना बिरदेवने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभागी घेतला पण त्यामध्ये अपयश आले. त्याने खचून न जाता मोबाईल, टीव्ही व खेळ यापासून अलिप्त राहून अभ्यासाला महत्व दिले. आणि स्पर्धा परिक्षेत लक्ष केंद्रित केले.आणि जिद्दीच्या जोरावर मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या आई वडीलांना आज आयपीएस चे गिफ्ट दिले.
…….
पुण्यातला किस्सा...
पुण्यातली एक किस्सा सांगितला जातो- परिस्थितीतशी दोन हात करत पुण्यात शिकत असताना दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेव चा मोबाईल हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. बिरदेव ने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेव ला मिळत होते. हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही.
…….
यश टप्प्यात…
अलीकडेच काही दिवसापूर्वी बिरदेवची मुलाखत झाली होती. त्यामुळे यामध्ये आपली निवड निश्चित आहे.अशी त्याला खात्री होती. याबाबत त्याने नौदलात असणारा त्याचा मित्र यश घाटगे याला फोनवर बोलताना माझे ध्येय अंतिम टप्प्यात आले आहे.असे सांगितले होते.
थेट मलाखत बिरदेव डोणे यांची…
———————————————————————————