पन्हाळा : प्रसारमाध्यम न्यूज
गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य कार्यकर्त्यांपासून विविध पदाधिकारी, जनप्रतिनिधी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत आहेत. आता या यादीत वेखंडवाडी ( ता. पन्हाळा ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सखुबाई खोत यांचेही नाव जोडले गेले आहे.
सखुबाई खोत या वेखंडवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर कार्यरत होत्या. मात्र समाजाच्या न्याय्य मागणीसाठी पदाचा त्याग करून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आरक्षण लढ्याला थेट पाठिंबा दिला आहे. त्यांचा राजीनामा सरपंच संतोष खोत यांनी स्वीकारला असून गावकऱ्यांसह मराठा समाजाने त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले आहे.
गावकऱ्यांनी खोत यांच्या या निर्णयाचे कौतुक करत, “आरक्षण मिळवण्यासाठी गरज भासली तर आम्हीही आंदोलनासाठी सज्ज आहोत,” अशा प्रतिक्रिया दिल्या. मराठा समाजात ऐक्य वाढवण्यासाठी आणि आंदोलनाला बळ देण्यासाठी हा राजीनामा मोलाचा ठरत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील महिला नेत्या असूनही समाजहितासाठी पदाचा त्याग केल्यामुळे खोत यांचे पाऊल आदर्शवत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील पदाधिकारीही अशा प्रकारे राजीनाम्याच्या मार्गाने आंदोलनात सहभागी होऊ लागल्याने राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सखुबाई खोत यांचा निर्णय हा फक्त वेखंडवाडीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मराठा समाजाच्या लढ्याला बळ देणारा ठरत असून, आगामी काळात आणखी पदाधिकारी या मार्गाने आंदोलनाला पाठिंबा देतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
———————————————————————————————————–