मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यात वाढत असलेल्या ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, यापुढे राज्यात ड्रग्सची तस्करी सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात आज विधान परिषदेत बोलताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की, ड्रग्स तस्करी आणि उत्पादन प्रकरणांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात ड्रग्सची पाळंमुळं उपटून टाकण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली असून, या निर्णयामुळे ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यरत करण्यात आले असून, प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी
ड्रग्स तस्करी संबंधित मोठ्या प्रकरणांसाठी केंद्र सरकारकडे फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापनेची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून अशा प्रकरणांचा जलद निकाल लागू शकतो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
“ड्रग्सच्या तस्करीला मुळापासून आळा घालण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. एमडी ड्रग्ससह सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई केली जाईल,” असे ठाम शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फुके यांचा सवाल : टास्क फोर्सचं काय ?
परिणय फुके यांनी सभागृहात बोलताना राज्यात मेफेड्रोनसह इतर अंमली पदार्थांची तस्करी झपाट्याने वाढत असल्याकडे लक्ष वेधलं. “राज्यात ड्रग्सचा विळखा पडत आहे. आपली संख्या देशात सर्वाधिक आहे. ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची गरज आहे. यासाठी आधीच ड्रग्सविरोधी टास्क फोर्स केली होती, त्याचं पुढं काय झालं ?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांचं उत्तर : कायद्यात सुधारणा होणार
फुके यांच्या सवालाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ड्रग्स तस्करी संदर्भात कायद्यात बदल करणार आहोत. या अधिवेशनातच नियमावली आणत आहोत, ज्यामुळे ड्रग्स तस्करी करणाऱ्यावर मकोका लावता येईल. मोठ्या प्रमाणात टास्क फोर्स कार्यरत आहे आणि कारवाया सुरू आहेत. ड्रग्स तस्करीला मुळापासून आळा घालण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत.”
खडसेंचा आरोप : सीमावर्ती भागातून तस्करी वाढली
शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही यावर प्रश्न उपस्थित केला. “मध्यप्रदेश, गुजरातमधून जळगावच्या मुक्ताईनगर परिसरात अफू, गांजाची तस्करी होत आहे. सीमावर्ती भागांतून अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतोय. याकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावं,” अशी मागणी त्यांनी केली.
सीमावर्ती भागात कारवाई केली जाईल
यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ” काही राज्यात भांगला परवानगी आहे, मात्र महाराष्ट्रात अफू, गांजाला कुठेच परवानगी नाही. मुक्ताईनगर किंवा इतर सीमावर्ती भागांत असे प्रकार घडत असतील तर कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
राज्यातील युवकांना ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि समाजात शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी हे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.
———————————————————————————————-