कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूरच्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय आणि केंद्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये राज्याचे यशस्वी प्रतिनिधित्व करून आपल्या कामगिरीची ठसा उमटवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २३३ खेळाडूंना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत एकूण १४ लाख ९५० रुपयांची रक्कम खेळाडूंना वितरित करण्यात येणार आहे.
या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, नेहरू कप हॉकी स्पर्धा आणि सुब्रतो मुखर्जी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसह इतर केंद्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.
शिष्यवृत्ती रकमेची श्रेणी ३७५० रुपयांपासून ते ११ हजार २५० रुपयांपर्यंत असून, ही रक्कम थेट संबंधित खेळाडूंच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे खेळाडूंना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी आवश्यक असणारे आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्हा नेहमीच क्रीडाक्षेत्रात आघाडीवर राहिला असून, येथील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या प्रतिभेची छाप पाडली आहे. शासनाच्या या आर्थिक सहाय्यामुळे खेळाडूंना अधिक प्रेरणा मिळेल तसेच भविष्यातील स्पर्धांसाठी ते अधिक आत्मविश्वासाने तयारी करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण असून, जिल्ह्यातील पालक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
——————————————————————————————–