प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राज्यात सुरू असलेल्या २९ महापालिका निवडणुकांदरम्यान तब्बल ६० हून अधिक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे हे बहुतांश उमेदवार सत्ताधारी महायुतीतील असून त्यात सर्वाधिक भाजपाचे, त्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी या बिनविरोध निवडींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सत्ताधाऱ्यांनी पैशाची आमिषे, दबाव आणि दहशतीचा वापर करून विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या आहेत, तिथल्या निवडणुकांना तात्काळ स्थगिती द्यावी आणि अंतिम निकाल येईपर्यंत ती कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या याचिकेवर उद्या, १४ जानेवारी रोजी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून, त्याआधीच ही सुनावणी होत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील असीम सरोदे यांनी सांगितले की, राज्यात याआधी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका झालेल्या नाहीत. ६८ ते ७० ठिकाणी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यामुळे लोकशाही प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण होत आहेत. तसेच, बिनविरोध निवडणुकीतसुद्धा मतदारांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि किमान मतदान टक्क्याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या बिनविरोध निवडींची चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या उद्याच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.






