spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeपर्यटनएसटी प्रवास होणार ‘स्मार्ट’

एसटी प्रवास होणार ‘स्मार्ट’

एसटी महामंडळाचा नवा डिजिटल आणि रिअल इस्टेट रोडमॅप

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात चाललेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने  ( एसटी ) आता डिजिटल आणि आर्थिक सुधारणा अशा दुहेरी वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक सुकर करण्यासाठी ओला, उबरसारखं खासगी वाहतूक सेवा अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय तर घेण्यात आलाच आहे, त्याचबरोबर उत्पन्नवाढीसाठी एसटीच्या मालकीच्या ८१ डेपोच्या जमिनींच्या विकासाला देखील गती देण्यात येणार आहे.
एसटीचं स्वतःचं ‘अ‍ॅप ’:
राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भरमसाठ नफा कमवून प्रवासी व चालकांना वेठीस धरणाऱ्या खासगी कंपन्यांच्या जोखंडातून मुक्त करण्याच्या प्रमाणित हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी अ‍ॅप बस, रिक्षा , टॅक्सी व ई-बस या वाहन सेवा करीता सुरू करण्याचे निश्चित केले आहे.
सदर ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्यात येईल. भविष्यात एस टी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणे व प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय ॲप एसटी महामंडळाने चालवणे योग्य राहील, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
नवीन शासकीय ॲप ला ” छावा राईड ॲप “ हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सरनाईक यांनी सांगितले.
जमिनी विकासाची ९७ वर्षांची लीज पद्धत :
महामंडळाच्या उत्पन्नाला बळकटी देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे एसटीच्या ८१ डेपोच्या जमिनी खासगी भागीदारांच्या सहभागातून विकसित केल्या जाणार आहेत. यासाठी दिला जाणारा लीज कालावधी पूर्वी ६० वर्षांचा होता, तो आता वाढवून तब्बल ९७ वर्षांचा करण्यात आला आहे. या जमिनी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन श्रेणींमध्ये विभागून कालबद्ध भाडेपट्टी (Time-bound Lease Rent) तत्वावर खासगी गुंतवणूकदारांना खुल्या स्पर्धेद्वारे देण्यात येणार आहेत.
संचयी नुकसान १०,००० कोटींच्या पुढे
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन महिन्यांपूर्वी सादर केलेल्या आर्थिक श्वेतपत्रिकेतील माहिती भयानक चित्र उभं करत आहे. एसटी महामंडळाचं संचयी नुकसान १०,००० कोटी रुपयांच्या पुढे गेलं असून, गेल्या पाच वर्षांत या तोट्यात तब्बल १२४ टक्क्यांची वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. मागील ४५ आर्थिक वर्षांपैकी केवळ ८ वर्षांत एसटीला नफा झाला आहे, उर्वरित सर्व वर्षांत तोटा कायम राहिला आहे.
अलीकडील काही निर्णयांमुळे एसटी महामंडळ नव्या वाटेवर प्रवास करण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. प्रवाशांना सोयीस्कर सेवा देणं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःला सक्षम करणं या दोन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून राज्य सरकारने यंदा एसटीसाठी एक नवा रोडमॅप आखला आहे.

————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments