कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जेव्हा प्रवासाची अन्य साधने नव्हती तेव्हापासून खेडोपाडी, दुर्गम भागात एसटी पोहचली होती, मग तो रस्ता कसाही असो आणि प्रवासी कितीही असोत. एसटी तेथे जाणार आणि अडलेल्या नाडलेल्यासाठी सेवेचा एक भाग बनणार. इतक ग्रामीण भागाशी एसटीचे नाते घट्ट झाले आहे.
कित्येक वर्षापासून ग्रामीण भागात एसटी दळणवळणाचे मुख्य साधन आहे. अनेकांची सकाळ ही एसटीच्या प्रवासानेच होते. मग ते शाळकरी मुले असो किंवा एखाद्या गावचा सरपंच असो… लालपरी अर्थात एसटीनेच जाणार. पण काही वेळा लालपरी वेळवर येत नसल्याने किंवा नेमकी बस कुठे पोहोचली हे समजत नसल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा होतो. प्रवाशांच्या सेवेसाठी आणि रस्ता तेथे एसटी या ब्रीद वाक्यानुसार राज्य परिवहन महामंडळ खेडोपाडी एसटीची सेवा प्रवाशांना देते. अशातच राज्यभरात विविध योजनांमुळे जाईन तर एसटीनेच, असा आग्रह ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा असतो. म्हणूनच राज्य परिवहन महामंडळ अर्थात लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य परिवहन महामंडळ आता लालपरीच्या प्रवाशांना आणखी एक सेवा उपलब्ध करून देणार आहे.
ज्याप्रमाणे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई लोकलचं वेळापत्रक आणि लाईव्ह लोकेशन कळतं त्याप्रमाणे लालपरीचे देखील आता लाईव्ह लोकेशन जाणून घेता येणार आहे. येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ लाईव्ह एसटी बस कुठे पोहोचली हे प्रवाशांना जाणून घेता यावं यासाठी नवी सुविधा करणार आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना याची ग्वाही दिली. त्यामुळे आता एसटी बस कुठे आहे? याचा ठावठिकाणा आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये एका ऑनलाईन आपलिकेशनच्या माध्यमातून समजणार आहे. लालपरीच्या लाईव्ह लोकेशनमुळे प्रवास आणखी सुलभ होईल. प्रवाशांना व राज्य परिवाहनच्या प्रशासनाला लालपरी कुठे आहे ते व कोणती समस्या आहे ते समजणार आहे.