मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. महामंडळाने १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एसटीच्या तिकीट भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तात्पुरती भाडेवाढ आहे असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
सणासुदीच्या गर्दीच्या काळात वाढणारा इंधन खर्च, देखभाल व इतर संचालन खर्च लक्षात घेऊन ही भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच्या तुलनेत अधिक भाडं मोजावं लागणार आहे. एसटी महामंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही भाडेवाढ केवळ २२ दिवसांपुरती असणार आहे आणि ६ नोव्हेंबरपासून पुन्हा नेहमीच्या दराने तिकीट मिळणार आहे. प्रवाशांनी या दरवाढीची नोंद घ्यावी आणि प्रवासाचे नियोजन योग्यरित्या करावे, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
सध्या सणासुदीचा काळ आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांत नोकरी, कामासाठी आलेले चाकरमानी दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या गावी जातात. दिवाळीच्या काळात लहान मुलांच्या शाळेलाही सुट्टी असते. त्यामुळे याच काळात काही कुटुंब फिरायला जाण्याचाही प्लॅन करतात. दरम्यान, आता याच सणासुदीच्या काळात एसटीने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आता एसटीने प्रवास करणे महागणार आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा मुद्दा महामंडळासाठी कायमच मोठी अडचण ठरलेला आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करतात, असा दावा केला जातो. त्यामुळे अशी भाडेवाढ करून महसूल वाढवण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाचा आहे. या भाडेवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे.
शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडून इतर बसेससाठी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
————————————————————————————————