कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
प्रवासास सर्व सामान्याना परवडेल असे एसटी बस वाहन आहे. अलीकडच्या काही वर्षांत एसटी बस जलद झाली आहे. याचबरोबर आरामदायीही झाली आहे. खासगी बसेसच्या तोडीची एस टी झाली आहे. याचा लाभ राज्य मार्ग परिवहन महामंडळास होत आहे. एसटीने गेल्या आठवड्यात ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीमध्ये सव्वाशे कोटींहून अधिकची कमाई केली आहे. प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून एसटी महामंडळाने चार दिवसांमध्ये १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
यावर्षी रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ११ ऑगस्ट या एका दिवशी तब्बल३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न असल्याची, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटीला दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी) या दोन दिवसांत विक्रमी उत्पन्न मिळत असते. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेकांनी प्रवासाचे साधन म्हणून एसटीला पसंती दिली. यामुळे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी ३०.०६ कोटी रुपये, रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ३३.३६ कोटी रुपये, तर सोमवारी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले.
या चार दिवसांत १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला असून, त्यात ८८ लाख इतक्या महिला प्रवासी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. परिवहन माहमंडळाचे १५ हजार बसचे जाळे महाराष्ट्रभर दररोज सुमारे ६० लाख प्रवाशांना सेवा देते.
एसटी बसची भारतीय पारंपारिक सणांशी आणि उत्सवाशी नाळ जोडली आहे. प्रत्येक सण उत्सवावेळी एसटी सज्ज असते, तत्पर आणि आरामदायी सेवा देण्यासाठी. अगदी खेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत एसटी कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रवाशाना पोहचवते. हा विश्वास एसटीने निर्माण केला आहे. तो सार्थ ठरविण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
—————————————————————————————–



