प्रसारमाध्यम डेस्क
एसटी महामंडळाने अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या एस टी गाड्या विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमध्ये आता चालकांवर नजर ठेवणारे कॅमेरे असणार आहेत. चालकाला झोप आली असली तर हे कॅमेरे अलार्म वाजवतील अशी व्यवस्था असणार आहे. एसटी महामंडळ एकूण पाच हजार एस टी बस विकत घेणार आहे. त्यातील एक हजार बसेस या ई-बसेस असणार आहेत. या गाड्या टप्प्या टप्प्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत.
पुण्यामध्ये आज स्मार्ट ई-बसेसच सादरीकरण झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील स्विकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई-बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या ई-बसेस एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या असाव्यात, अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही दिल्या होत्या,” यावेळी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे आज सादरीकरण करण्यात आले.
चालकावर लक्ष ठेवता येणार :
नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभया देत असेल किंवा मोबाईलचा वापर करत असेल तर हे कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई-बसेस मध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.
याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.