A proposal to divert the water of Panchganga River from Radhanagari Dam to Dudhganga River is under consideration.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कृष्णा–भीमा स्थिरीकरण प्रकल्प पुढे नेण्यासाठी सर्वेक्षण कार्य सुरू असून, पहिल्या टप्प्यात पंचगंगा नदीचे पाणी राधानगरी धरणातून दुधगंगा नदीत वळवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासाठी बोगदा खोदाईसह सुमारे १,६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी बॅरेजेस उभारण्याची योजना असून, त्याद्वारे पाणीपुरवठा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की, “ कृष्णा–भीमा स्थिरीकरण प्रकल्प पुढे नेण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. कोकणात जाणारे पाणी वळविण्याच्याही हालचाली सुरू असून, विशेषतः उल्हास खोऱ्यातील ६५ अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा विचार आहे. याचा अंतिम सर्वेक्षण अहवाल येत्या जानेवारीपर्यंत प्राप्त होईल.”
पुराच्या काळात साठणारे सुमारे ६५ अब्ज घनफूट पाणी बोगद्याद्वारे भीमा नदीत आणण्याचा दुसरा प्रस्तावही विचाराधीन आहे. हा प्रस्ताव खर्चिक असून, त्यासाठी केंद्र सरकार, जागतिक बँक, नाबार्ड आणि आशियाई विकास बँके कडून निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे सर्वेक्षण अद्यापही सुरू असून त्याचे सादरीकरण येत्या पंधरवड्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “ कृष्णा खोरे द्वितीय लवाद निवाड्यानुसार राज्याच्या वाट्याला आलेले पाणी प्रत्यक्ष वापरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे सादरीकरण लवकरच करण्यात येईल.”
याशिवाय, जलसंपदा विभागाच्या महामंडळाला पूर्णतः स्वायत्त करण्याचा निर्णय घेतला असून, उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. मत्स्यपालन, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमधून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. पुढील वर्षापासून महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे राज्यातील जलव्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होईल, तसेच दुष्काळ व पूर परिस्थितीशी प्रभावीपणे सामना करण्यासही सहाय्य मिळणार आहे.