मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
वनतारा प्रकल्पात वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन झालं आहे की नाही, याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (Special Investigation Team – SIT) गठीत करण्यात आलं आहे. या पथकाकडून आता सखोल चौकशी सुरू झाली असून, प्राण्यांची स्थलांतरण प्रक्रिया आणि त्यांची सध्याची स्थिती याची बारकाईने तपासणी करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वन्यजीव प्राण्यांना कायद्याच्या चौकटीत राहून वनतारामध्ये आणण्यात आलं का, त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधांची योग्य सोय करण्यात आली आहे का, आणि त्यांची देखभाल योग्य पद्धतीने होत आहे का हे सारे मुद्दे तपासाच्या केंद्रस्थानी असतील.
विशेष तपास पथकात वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि कायद्याचे जाणकार अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. हे पथक लवकरच वनतारामध्ये भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत प्राण्यांच्या स्थलांतरण, बंदिवास, आणि देखभाल यासाठी कठोर नियम लागू आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई होऊ शकते. वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी याप्रकरणी पारदर्शक आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे वनतारा प्रशासनाने सर्व नियमांचं पालन झाल्याचा दावा करत, तपासात सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. तपास अहवाल सादर झाल्यानंतरच पुढील कारवाई निश्चित होणार आहे.
विशेष तपास पथक या कथित आरोपांचा तपास करून १२ सप्टेंबरपर्यंत त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करणार आहे.
————————————————————————————————–



