कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५ विकेटने विजय मिळवून पहिल्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेने त्यांचा २७ वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ सुद्धा संपवला आहे. मागील २७ वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, मात्र अखेर आज त्यांना हे यश मिळालं आहे.
ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार म्हटले जात होते, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्याला गुडघ्यावर आणलं. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार बवूमा याने गोलंदाजी निवडली. पहिल्या डावात त्यांनी ऑस्ट्रेलियाला २१२ धावांवर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला १३८ धावांवर ऑल आउट केले. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला २०७ धावांवर रोखलं ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचं आव्हान मिळालं.
विजयासाठी मिळालेलं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेच्या एडन मारक्रमने शतक ठोकलं. तर कर्णधार बवूमाने देखी नाबाद अर्धशतकीय कामगिरी केली. दोघांनी नाबाद राहून तिसऱ्या दिवशीचा खेळ २१३ धावांवर संपवला, आता चौथ्या दिवशी विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला केवळ ६९ धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी संयमी फलंदाजी करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू : एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन (विकेटकिपर), विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू : उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड