कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
माती परीक्षण हा शेतीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःहून माती परीक्षण करूनच शेतीचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवृत्त कृषी अधिकारी आणि अभ्यासक संजय देसाई यांनी केले.
नाॅलेज टुरिझमच्या मीडिया इन्क्युबेटर उपक्रमांतर्गत “चला बोलूया” या विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम प्रसारमाध्यम कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसारमाध्यम समूहाचे संचालक प्रताप पाटील, मार्गदर्शक डाॅ. राजेंद्र पारिजात आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कृषी अभ्यासक संजय देसाई यांनी संवादाच्या सुरुवातीला शेतीच्या मूळ आरंभबिंदूवर मातीवर लक्ष केंद्रित करत शेतजमिनीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आजही देशातील केवळ ५ टक्के शेतकरी माती परीक्षण स्वतःहून करतात. उरलेले ९५ टक्के शेतकरी या अत्यावश्यक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य हळूहळू खालावत जाते.”
माती परीक्षणाचे फायदे :
-
मातीतील अन्नघटकांचे प्रमाण समजते
-
कोणत्या पिकाला कोणते व किती खत द्यावे, हे ठरवता येते
-
खतांचा अपव्यय टाळता येतो
-
जमिनीचा पीक उत्पादकतेचा कालावधी वाढतो
-
जमिनीतील सूक्ष्म अन्नघटकांची कमतरता लक्षात येते
कृषी अभ्यासक संजय देसाई –
शेतकरी अचूक माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करतील, तर उत्पादनात वाढ होईल आणि जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकून राहील. जमिनीचे साक्षेप ज्ञान नसताना खतांचा अंधाधुंद वापर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ करतो आणि शेतीत तोटा होण्याचे मुख्य कारण ठरतो. प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण केलं पाहिजे. जमिनीमध्ये काय अन्नघटक उपलब्ध आहेत आणि आपण पुढचं पीक कुठलं घेणार आहोत, त्याला कुठल्या अन्न घटकाची किती प्रमाणात आवश्यकता आहे ते बघून त्याप्रमाणे खताचा वापर केला पाहिजे. अलिकडे पाच टक्केच शेतकरी माती परीक्षण स्वतःहून करत असतात. ही शेतकऱ्यांच्या कडून दुर्लक्षित राहिलेली गोष्ट असून त्याचा जमिनीचे आरोग्य बिघडण्यावर परिणाम होत असतो.
अभ्यासाचा अभाव, रासायनिक अतिरेक आणि दुर्लक्षित बांधसंस्कृती –
खतांचा अमर्याद वापर सुरू आहे. यातून केवळ शेतकऱ्याचा खर्च वाढतोच, पण जमिनीचं आरोग्यही ढासळतंय. या वेळी त्यांनी माती परीक्षण, खतांचे योग्य नियोजन, जमिनीचा पीएच, सेंद्रिय घटकांचे महत्त्व, तसेच पारंपरिक बांध व्यवस्था यावर सखोल विचार मांडला.
मूलभूत प्रश्न आज शेतीत दुर्लक्षित आहेत. त्यामुळे खतांचा अमर्याद वापर होतो. या रासायनिक अतिरेकामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत, पीएच बिघडतो, आणि शेतीच्या मुळाशीच घात होतो.
जमिनीचा योग्य पीएच ६ ते ७ दरम्यान असतो. मात्र, हे पीएच टिकवण्यासाठी कुणाचंच लक्ष नाही. जमीनीतील सूक्ष्मजीव – विशेषतः जिवाणू यांचं प्रमाण चिंताजनकरीत्या कमी झालं आहे. एक ग्राम मातीमध्ये जिथे १ कोटी जिवाणू असायला हवेत, तिथे आज ते केवळ २०-३० लाखांपर्यंत उरले आहेत.
सेंद्रिय घटकांचा लोप आणि बांधसंस्कृतीचा मृत्यू –
पूर्वी शेतजमिनीला उंचीचे, रुंद बांध असायचे. त्या बांधांवर झाडं असायची. या झाडांची पानं खाली पडून नैसर्गिक खत तयार व्हायचं. सावली असायची. शेतकऱ्याला दुपारी निवांत बसायला जागा असायची. आज मात्र शेतकऱ्याच्या शेतात सावलीसुद्धा उरलेली नाही. बांध नसल्यानं मातीचा वरचा थर पावसाने वाहून जातो आणि तो परत तयार व्हायला तीन ते तीस वर्षं लागतात. शेतात झाडं नाहीत, पालापाचोळा नाही, कीटकनियंत्रक पक्ष्यांसाठी जागा नाही. ही सर्व एकत्रित परिस्थिती जमिनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करते.
शेतीत पारंपरिक ज्ञान आणि नैसर्गिक उपाय यांचा अभाव आजच्या शेतीचं मोठं संकट आहे. विद्यापीठांमध्ये संशोधन होतं, पण त्याचा उपयोग प्रत्यक्ष शेतकऱ्याला होतो का? यावर विचार व्हायला हवा. कीड नियंत्रण, सेंद्रिय कार्बन, बांधसंस्कृती, पीएच संतुलन ही सर्व परस्परसंलग्न साखळी आहे, जी आज तुटलेली आहे.
मातीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष –
पूर्वी कितीही पाऊस झाला तरी शेतातील सऱ्यांमध्ये पाणी तुंबत नसे. पण आज सिंचनाने दिलेलं पाणीही दोन-तीन दिवस सऱ्यांमध्ये साचून राहतं. जोराचा पाऊस झाला तर चार दिवस तुंबतं. यामागे फक्त पाऊस किंवा सऱ्यांची रचना जबाबदार नाही, तर मातीचं आरोग्य बिघडलेलं आहे.
मातीमध्ये जिथं पाणी मुरायचं, तिथं ते आता साचायला लागलंय. कारण मातीची कणरचना, म्हणजे तिच्या कणांची बनावटच बदलली आहे. ती कठीण झाली आहे, घट्ट झाली आहे. जिथं भुसभुशीतता असायला हवी, तिथं चिकटपणा आणि कडकपणा वाढलाय.
मातीचं आरोग्य म्हणजे काय ?
मातीचं आरोग्य म्हणजे केवळ खतांची भर नाही, तर त्यात पुढील साखळी येते :
-
मातीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण
-
मातीतील जिवाणूंची संख्या (एक कोटी प्रति ग्रॅम आवश्यक, पण आज फक्त २०-३० लाख)
-
मातीची कणरचना – म्हणजे ती भुसभुशीत, श्वसनक्षम असणं
-
मातीचा पीएच संतुलन (सामान्यतः ६ ते ७ योग्य)
शेतकरी म्हणतो, मजूर मिळत नाहीत म्हणून सेंद्रिय शेती किंवा माती सुधारणा करत नाही. किंवा खतं-मायक्रोन्युट्रिएंट्स महाग असल्यामुळे खरेदीच्या टप्प्याबाहेर जातात. ही स्थिती खरी आहे, पण यावर उपाय शोधणं आवश्यक आहे.
पर्याय आणि शिफारसी :
-
माती परीक्षण करा – जिवाणू, पीएच, सेंद्रिय कर्ब याचा आढावा घ्या
-
मातीची भुसभुशीतता वाढवा – सेंद्रिय खत, शेणखत, पालापाचोळा वापरा
-
बांधावर झाडं लावा – सावली, पालापाचोळा, जिवाणूंसाठी नैसर्गिक आधार
-
सिंचन पद्धती सुधारवा – सऱ्यांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी
-
वापसा स्थिती पाळा – विशेषतः ऊसासारख्या पिकांमध्ये वेळेवर लागवड करा
ही माहीती ‘प्रसारमाध्यम संवाद’ कार्यक्रमाच्या चर्चेतून साकारलेली असून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत माती परीक्षण, सेंद्रिय घटक वाढवणे, बांधावर झाडे लावणे यांसारख्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास शेतीचा दर्जा व भविष्य अधिक सुरक्षित होईल, असा संदेश यातून मिळतो.
—————————————————————————————–