काठमांडू : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळची सुरुवात असो वा रात्रीचा शेवट सोशल मीडिया शिवाय दिवसाची सांगता होत नाही. भारतात सुद्धा गावागावांपर्यंत सोशल मीडियाचा प्रभाव पोहोचलेला असताना, शेजारी मित्रराष्ट्र नेपाळने मात्र मोठा निर्णय घेत फेसबुक (Meta), इन्स्टाग्राम आणि X ( माजी ट्विटर ) यांसारख्या जागतिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तत्काळ प्रभावाने बंदी आणली आहे.
नेपाळ सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने याआधीच सर्व सोशल मीडिया कंपन्यांना देशात अधिकृत नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी २८ ऑगस्ट पासून सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपची पॅरेट कंपनी मेटा, तसेच युट्यूब, ट्विटर (X) आणि लिंक्डइन यांनी नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. अखेर मंत्रालयाने कठोर भूमिका घेत ही बंदी लागू केली.
दरम्यान, आजवर टीकटॉक, व्हीटॉक, वायबर आणि निंबज यांसारख्या प्लॅटफॉर्मनी नोंदणी केली असून, टेलिग्राम आणि ग्लोबल डायरीची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जे प्लॅटफॉर्म नेपाळ सरकारच्या नियम व अटी पूर्ण करत आहेत, त्यांना देशात परवानगी मिळत आहे.
सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित जागतिक कंपन्यांनी आवश्यक नोंदणी केल्यानंतर आणि मंत्रालयाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना पुन्हा नेपाळमध्ये कार्यरत होण्याची परवानगी दिली जाईल. तोपर्यंत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, युट्यूब, ट्विटर आणि लिंक्डइन या लोकप्रिय सोशल मीडिया साइट्स बंदच राहणार आहेत.
या निर्णयामुळे नेपाळ मधील लाखों वापरकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे, सरकारच्या या पावलाकडे डिजिटल सार्वभौमत्व आणि स्थानिक नियमनाची अंमलबजावणी म्हणून पाहिले जात आहे.
———————————————————————————————–