spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeराजकीयलाडक्या बहिणीं साठी सामाजिक विभागाचा निधी

लाडक्या बहिणीं साठी सामाजिक विभागाचा निधी

मंत्री शिरसाट नाराज

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

राखीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकार कडून लाडक्या बहिणींना आर्थिक गिफ्ट देण्याची जोरदार तयारी सुरू असून, यासाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया काय असतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी येत असून, त्याआधीच महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी १,५०० रुपये म्हणजेच एकूण ३,००० रुपये एकाच वेळी जमा करण्याचा सरकारचा मानस आहे. हे रक्कम ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ योजने अंतर्गत देण्यात येणार असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर ३१ जुलै रोजी शासन निर्णयाने ४१०.३० कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून वळवण्यात आला आहे. हा निधी अनुसूचित जातीसाठी राखीव योजनांचा होता. शासनाने याबाबत धोरणानुसार मंजूर आराखड्याअंतर्गत निधी वळवला असल्याचे म्हटले असले तरी, सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांवर कात्री लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
या आधीही, सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या एकूण १,८२७.७० कोटी रुपयांचा निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आला होता. त्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका करत संताप व्यक्त केला होता.
गेल्याच दिवशी अजित पवार व शिरसाट यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. त्या बैठकीत काय खलबतं झाली हे समजलेले नसतानाच लगेचच निधी वळवणूकीचा निर्णय जाहीर झाल्याने, पुन्हा एकदा राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारचा एकीकडे महिलांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून लोकानुनयी निर्णय घेण्याचा प्रयत्न असताना, दुसरीकडे मागासवर्गीय, अनुसूचित जाती व आदिवासी घटकांच्या योजनांवर परिणाम होत असल्याचा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे मंत्री शिरसाट आता काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
———————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments