नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा झळाळती यशोमुद्रा गाठली आहे. आयसीसीने (ICC) नुकतीच महिला वनडे फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली असून, मंधानाने ७२७ गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे.
गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या अव्वल स्थानासाठीच्या झुंजीत तिला अखेर यश मिळालं आहे. श्रीलंकेत झालेल्या ट्राय सिरीजच्या अंतिम सामन्यात तिने ठोकलेल्या शानदार शतकाने (वनडे कारकिर्दीतील अकरावं शतक) तिला या यशात मोलाचा वाटा मिळवून दिला. या मालिकेत सर्वाधिक धावा करत मंधानाने आपली सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली.
वनडे आणि टी-20 मध्ये दमदार आकडेवारी
स्मृती मंधानाने आत्तापर्यंत १०२ वनडे सामन्यांत ५०९५ धावा केल्या असून, तिच्या खात्यात ११ शतकं आणि ३१ अर्धशतकं आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये देखील ती आघाडीवर आहे. १४८ सामन्यांमध्ये ३० अर्धशतकं तिच्या नावावर आहेत. यामुळेच आयसीसी टी-20 क्रमवारीत देखील ती चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
भारतीय फलंदाजांचा टॉप 20 मध्ये ठसा
स्मृती मंधाना वगळता सध्या टॉप दहा मध्ये कोणतीही भारतीय महिला फलंदाज नाही. मात्र, टॉप 20 मध्ये जेमिमा रॉड्रिग्स (१४ व्या स्थानावर) आणि हरमनप्रीत कौर (१५ व्या स्थानावर) यांनी स्थान मिळवलं आहे.
भारत-इंग्लंड मालिकेची तयारी सुरू
स्मृती मंधानाला अव्वल क्रमांक मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर येणारी इंग्लंडविरुद्धची मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे :
-
पहिला सामना : २८ जून
-
दुसरा सामना : 01 जुलै
-
तिसरा सामना : 0४ जुलै
-
चौथा सामना : ०९ जुलै
-
पाचवा सामना : १२ जुलै
यानंतर, वनडे मालिका १६ जुलैपासून सुरु होणार आहे.
या मालिकेमुळे स्मृती मंधानासह संपूर्ण भारतीय संघासाठी आपली कामगिरी अधिक मजबूत करण्याची उत्तम संधी असणार आहे.
———————————————————————————————-



