लघु उद्योग म्हणजे असे उद्योग जे कमी भांडवल, मर्यादित मनुष्यबळ व स्थानिक साधनसंपत्ती वापरून चालवले जातात. हे उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात स्थानिक स्तरावर चालवले जातात आणि देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. लघु उद्योग हे स्थानिक आर्थिक विकासाला चालना देतात, बेरोजगारी कमी करतात आणि कौशल्यांचा वापर करून रोजगार निर्मिती करतात. अल्प गुंतवणुकीत सुरू करता येणारे हे उद्योग ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर चालवले जातात. आज – ३० ऑगस्ट राष्ट्रीय लघु उद्योग दिवस आहे, यानिमित्त लघु उद्योगाची माहिती पाहू…
राष्ट्रीय लघु उद्योग दिनाची पार्श्वभूमी :
१९४७ नंतरचा काळ: भारतात स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरणाचा जोर वाढवण्यात आला. त्यात लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. २००१ मध्ये भारत सरकारने औपचारिकपणे ३० ऑगस्ट हा दिवस “राष्ट्रीय लघु उद्योग दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवशी लघु उद्योगांच्या गरजा, समस्या व सक्षमीकरणावर भर दिला जातो.
राष्ट्रीय लघु उद्योग दिन (National Small Industry Day) हा भारतात दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी भारतातील लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राने देशाच्या आर्थिक, सामाजिक व औद्योगिक विकासात दिलेल्या योगदानाचा सन्मान केला जातो.
लघु उद्योगाचे प्रमुख दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. उत्पादन क्षेत्रातील लघु उद्योग आणि सेवा क्षेत्रातील लघु उद्योग. याशिवाय कामाच्या व्यापानुसार सूक्ष्म,लघु व मध्यम असे वर्गीकरण केले जाते.
उत्पादनाधारित लघु उद्योग:
-
कापड उद्योग – हॅन्डलूम, पॉवरलूम, रेडीमेड गारमेंट्स
-
फर्निचर तयार करणे – लाकडी/लोखंडी फर्निचर
-
फुटवेअर बनवणे – चप्पल, बूट, सॅंडल
-
प्लास्टिक वस्तू उत्पादन – बाटल्या, कंटेनर, पिशव्या
-
खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग – लोणचं, पापड, मसाले, बेकरी वस्तू
-
अग्रिकल्चर टूल्स बनवणे – नांगर, हत्यारे
-
लोखंडी वस्तू बनवणे – गेट्स, ग्रिल्स, हार्डवेअर
सेवा-आधारित लघु उद्योग :
संगणक दुरुस्ती आणि सेवा केंद्र, ब्युटी पार्लर / सैलून, फोटोग्राफी / विडीओग्राफी सेवा, प्रिंटिंग प्रेस / झेरॉक्स दुकान, टायपिंग, डेटा एंट्री, मोबाईल दुरुस्ती केंद्र, ट्रॅव्हल एजन्सी
कृषी-आधारित लघु उद्योग: डेअरी उद्योग – दूध उत्पादन, दूध प्रक्रिया, मधमाशी पालन, अंडी / पोल्ट्री फार्मिंग, सेंद्रिय शेती उत्पादने विक्री, औषधी वनस्पतींची शेती आणि प्रक्रिया
हस्तकला / कौशल्याधारित उद्योग: भांडी, मातीची मूर्ती तयार करणे, बास्केट बनवणे, शिलाई, ज्वेलरी डिझाइनिंग, बांबू / सुतारकाम