कुरुंदवाड: प्रसारमाध्यम न्यूज
गेले दोन-तीन दिवस पावसाने उसंत घेतली आहे. कोयना, वारणा, राधानगरी धरणातूनही सुरु असलेला विसर्ग अतिशय कमी करण्यात आला आहे. परिणामी शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत रात्रीतून मात्र सव्वा फुटाने वाढ झाली आहे. आज सकाळपासून चक्क ऊन पडले आहे. यातच पावसासह विविध धरणातील विसर्ग कमी झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीतही किंचीत वाढ झाली आहे. यामुळे शिरोळ तालुक्यात गुरुवारी दिवसभर स्थंलातर केलेल्या पुरग्रस्तांना खुपच मोठा दिलासा मिळाला आहे.
पुरामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यावर पाणी आल्याने गावां गावांचा संपर्क तुटला आहे. कृष्णा- पंचगंगेचे पाणी शेत -शिवारात शिरल्याने नदीकाठावर, मळी भागात, शेतशिवारात वस्ती करुन असलेल्या अनेक गावातील शेतकरी, ग्रामस्थांना आपल्या कुटुंब व जनावरासह स्थंलातर करावे लागले आहे. स्थंलातर केलेल्या पुरग्रस्तांना या दोन दिवसात जो मानसिक त्रास सोसावा लागला,त्यांचे जे हाल झाले ते शब्दात व्यक्त करता येण्यासारखे नाहीत. आज सकाळपासून तालुक्यात पावसाचा एक थेंबही पडला नाही. पहाटेपासून चक्क ऊन पडले आहे. हे पाहून स्थंलातरीत पुरग्रस्तांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे. कारण आज किंवा उद्यापासुन पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यास किमान येथून पुढे तरी हालवनवास होणार नाही.
दरम्यान कोयना धरणातून काल रात्री सुरु असलेला एकुण २१,९०० विसर्ग आज सकाळी आठ वाजल्यापासुन कमी करण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटावरुन आज सकाळी १ फुटापर्यंत खाली घेण्यात आले आहेत. यातून एकुण १०,००० क्युसेक विसर्ग सुरु आहे. वारणा धरणातून करण्यात येणारा विसर्ग पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. यातील विद्युत गृहातून १६३० क्युसेक विसर्ग एवढाच सुरु आहे. राधानगरी धरणाचा ६ क्रमांकाचा एकच स्वंयचलित दरवाजा उघडा असून यामधून एकुण २९२८ क्युसेक विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरणातुन २,५०,००० विसर्ग , हिप्परगी धरणातूनही २,२५,९५० क्युसेकने विसर्ग करण्यात येत असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील पुरस्थितीत आज सांयकाळपासुन सुधारणा होण्याची शक्यता आहे.
आज शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणात ९८.७८ टीएमसी,वारणा धरणात ३१.६२ टीएमसी,राधानगरी धरणात ८.२९ टीएमसी तर अलमट्टी धरणात ९७.२८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान नृसिंहवाडी जवळ काल गुरुवारी सांयकाळी पाच वाजता पाणी पातळी ६० फुट १ इंच होती ती आज सकाळी आठ वाजेपर्यंत ६१ फुट ३ इंच झाली आहे. यानुसार रात्रीतून मात्र सव्वाफुटाने वाढ झाल्याचे दिसुन येते. तर राजाराम बंधारा कोल्हापूर येथे काल सांयकाळी पाच वाजता पाणी पातळी ४३ फुट ६ इंच होती, ती आज सकाळी आठ वाजेपर्यंत ४२ फुट ११ इंचावर आली आहे. यानुसार ७ इंचाने पाणी पातळी कमी झाली आहे. हे दिसुन येते. दरम्यान आज सकाळपासून आकाश पूर्ण निरभ्र असून ऊन पडले आहे. यामुळे तालुक्यासह पुरग्रस्तांच्या चेहर्यावरील चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
————————————————————————————-



