कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पॉप गायिका केटी पेरीसह सर्व सहा महिला अंतराळ प्रवास करून सुरक्षितपणे परतल्या आहेत. त्यांचा हा अंतराळ प्रवास जवळपास 11 मिनिटांचा होता.
ही क्रू अंतराळात पोहोचली तेव्हा केटी पेरी गाणं गात होती, असं सांगितलं जात आहे. त्यांच्या विमानानं ताशी २३०० किमी वेगानं प्रवास केला. हा वेग ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट अधिक आहे. या टीममध्ये पॉप गायिका, पत्रकार, वैज्ञानिक आणि चित्रपट निर्मात्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सहा महिलांचा समावेश होता. प्रख्यात उद्योजक जेफ बेझोस यांची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनच्या ‘न्यू शेपर्ड रॉकेट’द्वारे सहा महिलांची ही संपूर्ण टीम अंतराळात गेली होती.महिलांची संपूर्ण टीम अंतराळात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी रशियन अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोव्ह यांनी १९६३ मध्ये एकट्याने अंतराळात प्रवास केला होता. ब्लू ओरिजिनने आयोजित केलेल्या या सहलीमध्ये पॉप गायिका कॅटी पेरी, पत्रकार गेल किंग, नागरी हक्क वकील अमांडा इंग्वेन, नासाच्या माजी रॉकेट शास्त्रज्ञ आयशा बोवे आणि चित्रपट निर्मात्या कॅरियन फ्लिन सहभागी होत्या.समूहातील सहावी महिला लॉरेन सांचेझ या होत्या. त्यांनी टीमचं नेतृत्व केलं. त्या जेफ बेझोसच्या मैत्रीण आहेत.या सर्व महिला कार्मन रेषा ओलाडून अंतराळात गेल्या. कार्मन रेषा ही पृथ्वी आणि अंतराळ यांच्यातील एक काल्पनिक सीमा आहे. ती पृथ्वीच्या वातावरणापासून दूर आहे.
महिलांचा अवकाश प्रवास
या सहा महिलांनी न्यू शेपर्ड-31 नावाच्या या मोहिमेवर ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटमधून प्रवास केला.
रॉकेटच्या आत असलेलं अंतराळ यान पूर्णपणे स्वयंचलितपणे (ऑटोमेटिक) कार्य करणारं होतं. म्हणजेच अंतराळयान चालवायला आत कोणीही नव्हतं.
हा प्रवास अंदाजे ११ मिनिटांचा होता.
या सर्व महिलांनी अंतराळातून पृथ्वीच्या विलोभनीय दृश्याचा आनंद घेतला. त्यानंतर पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू केला.
न्यू शेपर्ड रॉकेट १४ एप्रिल (सोमवार) रोजी अमेरिकेतील वेस्ट टेक्सास येथील कंपनीच्या प्रक्षेपण केंद्रातून अवकाशात पाठवलं गेलं.
लॉरेन सांचेझ यांनी व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत २०२३ मध्ये महिलांच्या अंतराळ उड्डाणाच्या स्वप्नाचा उल्लेख केला होता.
ब्लू ओरिजिननं एका निवेदनात म्हटलं आहे, “ही केवळ एक अंतराळ मोहीम नाही. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठीचं हे मिशन आहे.”