शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनातून प्रगती साधावी : जिल्हाधिकारी, चंदगड येथे रेशीम इनपुट सेवा केंद्राचे उद्घाटन

0
137
The inauguration of the expanded Silk Input Service Center of the Kolhapur Silk Producer Company at Chandgad was held by District Collector Amol Yedge and presided over by MLA Shivaji Patil.
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

रेशीम व बांबू उत्पादनाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम व बांबू उत्पादनातून प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. चंदगड येथील कोल्हापूर रेशीम प्रोड्यूसर कंपनीच्या विस्तारित रेशीम इनपुट सेवा केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व आमदार शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 

आमदार शिवाजी पाटील – रेशीम उत्पादन, काजू उत्पादन व अन्य उत्पादनांमधून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, यासाठी तसेच चंदगड तालुक्यातील सर्व विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे सहकार्य करत आहेत. चंदगड भागात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, या भागात जास्तीत जास्त प्रमाणात रेशीम उत्पादन व्हावे व रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे – जिल्ह्यात रेशीम उत्पादक एकूण ८४१ शेतकऱ्यांपैकी ६०२ रेशीम उत्पादक शेतकरी केवळ चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तीन तालुक्यांमध्ये आहेत. राज्य शासनाच्या रेशीम संचालनालय अंतर्गत एकमेव अंडीपुंज निर्मिती केंद्र गडहिंग्लज मध्ये कार्यरत आहे. या भागामध्ये रेशीम उत्पादनाला चांगले वातावरण आहे. तसेच नाबार्डच्या प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड (पीओडीएफ) अंतर्गत स्थापित कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून व जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, याचा लाभ घेऊन जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादन घेऊन सर्वांगीण प्रगती साधावी. 

येत्या काळात रेशीम कोष खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व या कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनाबरोबरच रेशीम कोषांची खरेदी करून रेशीम धागा निर्मितीसाठी प्रयत्न करावेत व ही संख्या दरवर्षी दुपटीने वाढावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ए. डी. जाधव – शेतकऱ्यांनी कंपनी मार्फत एकात्मिक रेशीम शेती प्रकल्प राबवावा. तसेच रेशीम कोशांची गुणवत्ता, उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी या उत्पादनातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी मूल्यवर्धित उत्पादनांची साखळी निर्माण करावी. सिल्क, मिल्क आणि मीट संकल्पनेवर आधारित चांगल्या दर्जाचा चारा निर्माण करुन दुभत्या जनावरांसाठी प्रथिनयुक्त खाद्य तयार केल्यास रेशीम उत्पादनाबरोबरच दुग्ध उत्पादन वाढेल. रेशीम बीज उत्पादनाचा कार्यक्रम राबवल्यास उत्पन्नात भरीव वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.

आशुतोष जाधव – कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मधील रेशीम प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकांचे क्षमता वर्धन करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत पुण्यातील महा एफ.पी.सी. ही संस्था काम करत आहे, जेणेकरून कंपनीचे व्यवस्थापन उत्तम होऊन कंपनीची वाटचाल यशस्वी होईल. येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील ही रेशीम उत्पादक कंपनी रेशीम उत्पादनात देशातील सर्वात चांगली कंपनी ठरावी, यासाठी येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.

कंपनीचे अध्यक्ष भावकू कालखांबकर व रेशीम उत्पादक शेतकरी विशाल हजेरी यांनी मनोगतातून रेशीम उत्पादनातून साध्य केलेल्या प्रगतीबाबत माहिती दिली. आभार श्री. गुरव यांनी मानले.

उपस्थिती- राष्ट्रीय रेशीम प्रकल्प गव्हर्मेंट ऑफ क्युबाचे सल्लागार ए. डी. जाधव, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक आशुतोष जाधव, गडहिंग्लज उपविभागाचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, रेशीम कार्यालयाचे एस. व्ही.गुरव तसेच संबंधित अधिकारी व रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

———————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here