The Kolhapur District Silk Office is implementing the Silk Department's Doorstep Campaign from September 1, 2025.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्हा रेशीम कार्यालयाकडून रेशीम विभाग आपल्या दारी मोहीम १ सप्टेंबर २०२५ पासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे ५०० रु. प्रति एकर याप्रमाणे नोंदणी केली होती. परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद्योग सुरु केला नाही अशा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम योजनेचे माहितीपत्रक व रेशीम उद्योग सुरु करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी तुती लागवड का केली नाही याबाबत अभिप्रायही घेण्यात येणार आहे.
रेशीम विभाग आपल्या दारी हे अभियान १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार असून त्याचा शुभारंभ बेले ( ता. करवीर ) येथून करण्यात आला. यावेळी केंद्रीय रेशीम मंडळ धारवाड येथील शास्त्रज्ञ डॉ. विराजकुमार, बेले गावच्या सरपंच अर्चना लांबोरे तसेच अंडीपुंज निर्मिती केंद्राचे रेशीम विकास अधिकारी डॉ. भगवान खंडागळे, रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहायक प्रविण निकम, क्षेत्र सहायक प्रियंका चंदनशिवे, बेले गावचे ग्रामरोजगार सेवक तानाजी पाटील उपस्थित होते.
जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर मार्फत रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्यात येते. एका गावातून कमीतकमी पाच शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या समतीने जिल्हा रेशीम कार्यालयाकडे ग्राम रोजगार सेवकांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज करावेत. यासाठी प्रति एकर ५०० रु. नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात जमा करावे.
मनरेगा अंतर्गत एक एकर वृक्ष लागवड जोपासना यासाठी तीन वर्षात रु. २ लाख १२ हजार ७८४ मजुरी दिली जाणार आहे. रेशीम कीटक संगोपनगृह बांधकामासाठी मजुरी म्हणून रु. ६६ हजार ४५६ तर साहित्यासाठी रु. १ लाख ५३ हजार रुपये देण्यात येणार आहे, अशा प्रकारे एकूण रु. ४ लाख ३२ हजार २४० रुपये तीन वर्षात दिले जाणार आहेत.
बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कत सिल्क समग्र २ योजनेत सहभाग घेता येईल. तुती वृक्ष लागवडीसाठी एक एकराकरीता ४५ हजार रुपये, सिंचन व्यवस्थेसाठी ४५ हजार, संगोपन गृह बांधकामासाठी रु. २ लाख ४३ हजार ७५०, संगोपन साहीत्यासाठी ३७ हजार ५०० आणि निर्जंतुकीकरण औषधीसाठी ३ हजार ७५० रुपये काम पूर्ण झाल्यानंतर दिले जातात.
मुख्यमंत्री महोदयांनी या पावसाळ्यात तुतीच्या ४ कोटी वृक्षांची लागवड करुन पर्यावरणाचे रक्षण करण्याचे उद्दीष्ट दिले आहे. याव्दारे तुती वृक्ष लागवडीची गणना करण्यात येणार आहे. रेशीम संचालनालयाला ४ कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला असून त्यापैकी १४ लाख तुती वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट कोल्हापूर जिल्ह्यास देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पर्यावरण पूरक आणि शेतीशी निगडीत रेशीम उद्योग सुरु करुन रेशीम कोष निर्मितीसह आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी केले आहे.