नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार नेतृत्व आणि अप्रतिम फलंदाजी करून भारताला मालिकेत बरोबरी मिळवून देणारा कर्णधार शुबमन गिलने आणखी एक मोठा किताब पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जुलै-२०२५ महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर करताना गिलची निवड केली आहे.
गिलच्या नेतृत्वाखाली भारताने पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना अवघ्या ६ धावांनी जिंकत मालिका २-२ ने बरोबरीत सोडवली. ही गिलची कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी मालिका होती. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाला सक्षमपणे मार्गदर्शन करत त्याने स्वतःची छाप पाडली.
या पुरस्कारासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार व ऑलराउंडर वियान मुल्डर यांचीही नामांकनात निवड झाली होती. मुख्य लढत गिल आणि स्टोक्स यांच्यात झाली, मात्र गिलने येथेही सरशी मिळवत हा बहुमान आपल्या नावावर केला.
शुबमनच्या कारकिर्दीतील हा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकण्याचा चौथा विक्रम असून, कसोटी कर्णधार झाल्यानंतर हा त्याचा पहिलाच सन्मान आहे. याआधी गिलने फेब्रुवारी २०२५ मध्ये, तसेच २०२३ साली जानेवारी आणि सप्टेंबर महिन्यात हा पुरस्कार जिंकला होता.
आयसीसी एका महिन्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना नामांकन देते. चाहत्यांकडून ऑनलाईन मतदान घेतल्यानंतर आणि खेळाडूच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेऊन विजेत्याची निवड केली जाते.
जुलै महिन्यातील गिलची कामगिरी :
गिलने इंग्लंड विरुद्ध जुलै महिन्यात एकूण तीन सामने खेळत ऐतिहासिक ९४.५० च्या सरासरीने ५६७ धावा केल्या. बेन स्टोक्सने ३ सामन्यांत २५१ धावा करत १२ विकेट्स घेतल्या, तर वियान मुल्डरने झिंबाब्वेविरुद्ध २ सामन्यांत ५३१ धावा व ७ विकेट्स मिळवल्या. मात्र, गिलच्या सातत्यपूर्ण आणि निर्णायक खेळीसमोर दोघांनाही मागे पडावे लागले.
या कामगिरीमुळे गिलने केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे, तर कसोटीतील नवा दमदार कर्णधार म्हणूनही स्वतःची ओळख अधोरेखित केली आहे.
————————————————————————————————-