Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क:

तुळजापूरच्या मंदिरात ‘आराध’ बसण्याची पद्धत आहे. लग्नानंतर नवरानवरी, आईवडील, जवळचे नातेवाईक मंदिरातच एका खोलीत, त्यांच्या घरातील पद्धतीनुसार सात ते पंधरा दिवस आराध बसतात.

या कालावधीत मंदिराच्या आवाराच्या बाहेर यायचे नसते. या आराध्यांना देवळातून वर जाण्याची परवानगी नसते. पण त्यांना मंदिराच्या खालच्या बाजूला म्हणजे आराधवाडीकडे जाण्याची परवानगी असते. त्यामुळे त्यांचे नातेवाईक त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात. ही व्यवस्था पाचपन्नास माणसांपर्यंतदेखील असू शकते. आराध बसणारी मंडळी या काळात जोगवा मागतात. ही प्रथा आजही अनेक घरांत कटाक्षाने पाळली जाते, हे विशेष. तुळजापूरचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे एकमेकांच्या घरी दिवाळी व इतर सण-समारंभानिमित्त जेवणाचे ताट देणे. असे ताट गल्लीत असलेल्या संबंधित प्रतिष्ठित व प्रसिद्ध लोकांच्या घरी दिले जाते. पण हे एक केवळ कर्तव्यभावनेने उरकणे नसून चवीने केलेले पदार्थ इतरांनी आवर्जून खावेत या प्रेमाने, आपुलकीने दिलेले असते.

या जेवणात प्रामुख्याने गरम पुरणपोळी, मटण, भजी यांचा समावेश असतो.

इथल्या स्वयंपाकात केवळ दोनच प्रकारचे तिखट वापरले जाते. पकी एक तांबडे व दुसरे मसाल्याचे. पकी मसाला विशेषत: मांसाहारी जेवणासाठीच मोठय़ा प्रमाणात  वापरला जातो.

 

इथल्या पुजाऱ्यांचे (भोप्यांचे) वैशिष्टय़ असे की, येणारा यात्रेकरू ज्या भागातील असेल त्याच्याच पद्धतीने जेवण बनवण्याची त्यांची खासियत आहे.  आंध्र आणि कर्नाटकच्या लोकांना भात आणि आमटी लागते व त्यातही आमटीत जास्तीतजास्त चिंचेचा कोळ आणि तिखट घातलेले त्यांना आवडते. हे या पुजाऱ्यांच्या बायकांना पक्के माहीत झालेले आहे.

         या बायकांना स्वयंपाकाची इतकी सवय झाली आहे की, त्यांना त्याचे काहीच अप्रूप वाटत नाही. पाचशे माणसांचा स्वयंपाक करताना त्यांच्या ज्या वेगवान हालचाली होत असतात, त्याही पाहण्यासारख्या असतात. तुळजापुरात आता दर्शनासाठी नेहमीच प्रचंड गर्दी असते. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणासारखे हवामान व कुलदेवतेच्या माहात्म्याने या शहराचे एक वेगळे स्थान होते. आता पाण्याची बोंब व हवेचे प्रदूषण झाल्याने फक्त मातेचे माहात्म्य जिल्ह्य़ाला तारत आहे. देवीची जी साडेतीन पीठे आहेत, त्यातही इथल्या प्रथा खूप वेगळ्या आहेत.

इथे कवडय़ांच्या माळा घालणे, बांगडय़ा भरणे, जोगवा मागणे, दिवटीला तेल घालणे याही प्रथा आहेत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here