कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ‘ श्री गणेशा आरोग्याचा २०२५’ या अनोख्या अभियानातून समाजात आरोग्य जागृती आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन येत आहेत. हे अभियान गणेशोत्सवाला सामाजिक परिमाण देणार आहे.
भारताला सण-उत्सवांचा देश म्हणून ओळखले जाते, तर कोल्हापूर हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समाजसेवेचा वारसा जपणारा जिल्हा आहे. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा सण असून, विघ्नहर्ता श्री गणेशाच्या भक्तीतून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची येथील परंपरा आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान यंदा या परंपरेला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात ‘आरोग्य हेच खरे धन’ हे तत्त्व लोक विसरत चालले आहेत. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. ‘सावध रहा अन् सुखी रहा’ या तत्त्वानुसार, या अभियानातून ‘उपचारापेक्षा प्रतिबंध हाच श्रेष्ठ’ ही भावना रुजवली जाणार आहे.
विविध उपक्रमांची रेलचेल
अभियानांतर्गत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांमध्ये रक्तदाब, शुगर, डोळे आणि दंत तपासणी केली जाणार आहे. ‘स्वच्छतेतच खरे सौंदर्य आहे’ या संदेशासह गणेश मंडप आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या जाणार आहेत. याशिवाय, प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून आहारशास्त्र, व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्याविषयी व्याख्याने आयोजित केली जाणार असून, सजीव देखाव्यांद्वारे जनजागृती केली जाईल.
रक्तदान : जीवनदानाचा संकल्प



