श्री दत्तजयंती : इतिहास, परंपरा आणि श्रीदत्तप्रभूंच्या जन्मकथा

दत्त जयंती विशेष गुरूंची शब्दसेवा : अध्याय 3

0
35
Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क : 

भारतीय अध्यात्मपरंपरेत मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. याच दिवशी, मृग नक्षत्रावर, सायंकाळी श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्री दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र, कर्नाटकमधील दत्तक्षेत्रे, तसेच भारतातील विविध संप्रदायांत हा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा होतो.

दत्त जन्म कथा
दत्तात्रय हा शब्द ‘दत्त’ व ‘आत्रेय’ अशा दोन शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि ‘अत्रेय’ म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.
अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.
श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.
याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.
भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.


दत्तजयंतीचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व

प्राचीन काळात भूतलावर आसुरी शक्तींचा प्रचंड प्रभाव वाढला होता. देवगणांचे विविध प्रयत्न असफल झाल्यानंतर ब्रह्मदेवाच्या आदेशाने देवत्रयींना (ब्रह्मा–विष्णू–महेश) विविध स्वरूपांत अवतार घ्यावे लागले. याच अनुषंगाने दत्तदेवतेला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला. त्यांच्या अवतारकार्यामुळे दैत्यांचा नाश होऊन पृथ्वीवर पुन्हा संतुलन येऊ शकले.

दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्त्व पृथ्वीतलावर नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते असे मानले जाते. या दिवशी मनोभावे उपासना केल्यास भक्तांना अध्यात्मिक उन्नती, शांतता आणि कृपाकटीवर संरक्षण मिळते.

उत्सव साजरा करण्यातील परंपरा

दत्तजयंतीसाठी शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी उल्लेखात नसला, तरी दीर्घकाळापासून समाजात काही प्रथा प्रचलित आहेत :

 गुरुचरित्र सप्ताह: उत्सवापूर्वी सात दिवस ‘श्री गुरुचरित्र’ या ग्रंथाचे पारायण केले जाते. या पारायणाला ‘गुरुचरित्र सप्ताह’ असे म्हणतात.

मंदिरोत्सव : औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, माहूर अशा प्रसिद्ध दत्तक्षेत्रांत हजारो भक्तांची गर्दी होते.
भजन, कीर्तन, दत्तयज्ञ, महाप्रसाद, पालखी सोहळे, रथोत्सव असे अनेक कार्यक्रम दिवसभर चालतात.

 पूजा, आरती आणि प्रसाद: दत्तगुरूंची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा केली जाते. सुंठवडा (खोबरे, गूळ, सुकामेवा व आल्याचा मिश्रण) हा प्रसाद दिला जातो.

श्री दत्तात्रेयांची प्रतीके

कमंडलू व जपमाळ – ब्रह्मदेवाचे प्रतीक

शंख व चक्र – विष्णूचे प्रतीक

त्रिशूळ व डमरू – शंकराचे प्रतीक

गाय (पाठीमागे) – पृथ्वीमातेचे प्रतीक

चार श्वान – चार वेदांचे प्रतिनिधित्व

                                          श्री दत्तांची अलौकिक भ्रमंती

श्रीदत्तगुरू एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसत असत. त्यांचे स्थूल रूप एका ठिकाणी दिसले, तर सूक्ष्म रूप जगभर भ्रमण करत असे. त्यांच्या भ्रमंतीविषयी लोककथांमध्ये वर्णन आहे :

वाराणसी – स्नान

प्रयाग – चंदन उटी

कोल्हापूर – भिक्षा

पांचाळेश्वर (गोदावरी पात्र) – दुपारचे भोजन

राक्षसभुवन (बीड) – तांबूलभक्षण

नैमिषारण्य – प्रवचन

माहूर – निद्रा

गिरनार – योग

त्यांच्या लीलांमध्ये श्रीकृष्णांच्या लीलांचे प्रतिबिंब दिसते.

समाजातील श्री दत्तांची उपासना : संप्रदाय परंपरा

भारतामध्ये शैव, वैष्णव, शाक्त तसेच अनेक संप्रदाय दत्तात्रयांची भक्ती करतात. महाराष्ट्रात दत्त आराधना विशेष तेजस्वी परंपरा म्हणून ओळखली जाते.
दत्तजयंती हा केवळ उत्सव नसून, तीन देवांच्या एकत्रित तत्त्वाचे स्मरण आहे. त्रिगुणात्मक शक्ती, त्रिविध ज्ञान आणि त्रिदेवांचे सूक्ष्म तत्त्व दत्तात प्रकट होते. त्यांच्या जन्मदिवशी सत्संग,गुरुचरित्र पारायण,दत्त नामस्मरण,भजन–कीर्तन, दान–धर्म याने मन शुद्ध होते, अहंकार निवळतो आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो.

श्रीदत्तात्रेय हे ज्ञान, वैराग्य, योग आणि भक्ती यांचे अद्वितीय संगम आहेत. त्यांच्या उपासनेने मनातील द्वंद्व नाहीसे होऊन जीवन सुगंधित होते. दत्तजयंतीचा दिवस आपण सर्वांनी आत्मशुद्धी, गुरुकृपा आणि आध्यात्मिक विचारांची वाटचाल यासाठी उपयोगात आणावा.

   ।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here