Today, Wednesday, September 24, 2025, during the Sharadiya Navratri festival, Karveer Niwasini Shri Ambabai appeared before the devotees in the form of Tara.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आज बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी शारदीय नवरात्र महोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई तारा स्वरूपात भक्तांसमोर प्रकट झाली. दशमहाविद्यांपैकी एक असलेली भगवती तारा तिच्या भक्तांच्या श्रद्धा व भक्तीचा केंद्रबिंदू ठरली आहे.
ताराचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या ओंकार असा आहे. या ओंकाराची शक्ती म्हणून तारा या नावाने ओळखली जाते. हातामध्ये खपर, नीलकमल, खड्ग आणि कात्री धारण करणारी तारा भक्तांना संसार सागरातून तारून नेणारी म्हणजे पार नेणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. भगवती तारा एकजटा नील सरस्वती या नावाने सुद्धा ओळखली जाते. तिच्या पायाखाली शव आहे आणि तिला लंबोदर, ब्रम्हांड जननी स्वरूपातही दाखवले जाते. वाणीची प्रधान देवता असणारी तारा दशमहाविद्यांमध्ये महत्त्वाची मानली जाते. काली आणि तारा या सारख्या वाटल्या तरी नील वर्ण, लंबोदर आणि हातातील कात्री हे तिचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे.
ताराच्या अवताराबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, सागर मंथनानंतर विष पिऊन असलेल्या भगवान शंकरांचे रक्षण करण्यासाठी देवीने तारा स्वरूप धारण केले. दुसऱ्या कथेनुसार, हयग्रीवाच्या वधावेळी भगवान नारायणांना सहाय्य करण्यासाठी नील वर्ण शक्ती प्रकट झाली. तिसऱ्या कथेनुसार, महर्षि वसिष्ठांनी तिची उपासना केली आणि ती प्रभू रामचंद्रांना रावणवधासाठी सहाय्य करणारी आदिशक्ती ठरली.
भक्त आज तारास्वरूपीणी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतात की, भगवती तारा त्यांना कठीण परिस्थितीतून आणि संसार सागरातून सहज तारून घेऊन अखंड रक्षण करो. करवीरमध्ये नवरात्र महोत्सव भक्तांच्या श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेने नटलेला असल्याने येणाऱ्या भाविकांना याचा सुखद अनुभव येत आहे.