कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मराठी सांस्कृतिक परंपरेतील लावणीच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणारी एक महत्त्वाकांक्षी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘छावा’ फेम लक्ष्मण उत्तेकर करत असून, संगीत रचना करत आहेत लोकप्रिय संगीतकार जोडी अजय-अतुल. श्रद्धा कपूर सारख्या आघाडीच्या अभिनेत्रीला या ऐतिहासिक भूमिकेसाठी निवडल्यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटाच्या तयारीची सुरुवातही जोरदार झाली आहे. नुकतीच पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंड येथे प्रसिद्ध लावणी कलाकार व विठाबाई यांच्या कन्या मंगला बनसोडे यांची लक्ष्मण उत्तेकर व अजय-अतुल यांच्यासोबत सुमारे दोन तास प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत विठाबाईंच्या आयुष्यातील पैलूंवर, त्यांच्या लावणीतील योगदानावर तसेच चित्रपटातील सांस्कृतिक वास्तवतेवर सखोल विचारविनिमय झाला.
या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून, विठाबाईंच्या जीवनाचा भव्यपट प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा संकल्प या टीमने केला आहे.
श्रद्धा कपूरचा पारंपरिक लावणी नृत्यातील अभिनय, अजय-अतुल यांचं सुरेल संगीत आणि लक्ष्मण उत्तेकर यांचं दिग्दर्शन या त्रयीच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीला एक अभिमानास्पद कलाकृती मिळण्याची शक्यता प्रबळ आहे.
चित्रपटाविषयी अधिक माहिती लवकरच जाहीर होणार असून, तोपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहणे अवश्य लागणार आहे !
——————————————————————————————-