कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF-२०२५) मध्ये शिवाजी विद्यापीठाने यंदा ऐतिहासिक यश संपादन केले आहे. राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या यादीत आगेकूच करीत विद्यापीठाने थेट देशातील आघाडीच्या ५० विद्यापीठांत स्थान मिळवले असून, ५१.८० गुणांसह ४५ वे स्थान पटकावले आहे.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी शिवाजी विद्यापीठाचा समावेश ५१-१०० या रँकबँडमध्ये झाला होता. मात्र, यंदा विद्यापीठाने आणखी प्रगती करत १-५० या श्रेणीत प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून, कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
या यादीत महाराष्ट्रातील आणखी तीन विद्यापीठांना स्थान मिळाले आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ११ व्या स्थानी, मुंबई विद्यापीठ १२ व्या स्थानी, तर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ ४३ व्या स्थानी आहे.
रँकिंगचे निकष
राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी ही विविध शैक्षणिक व सामाजिक घटकांच्या आधारे केली जाते. त्यात अध्यापन व अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर आणि व्यावसायिक कृतिशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठीचे प्रयत्न, विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांचा विचार करून एकूण गुणांकन निश्चित केले जाते.
गेल्या वर्षी शिवाजी विद्यापीठाचा या यादीमध्ये ५१-१०० या रँकबँडमध्ये समावेश झालेला होता. यंदा शिवाजी विद्यापीठाने क्रमवारीत आणखी आगेकूच करीत १-५० या रँकबँडमध्ये स्थान प्राप्त केले आहे. देशातील आघाडीच्या ५० विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ आता ५१.८० गुणांकनासह ४५ व्या स्थानी पोहोचले आहे. या यादीत महाराष्ट्रातील आणखी ३ विद्यापीठे आहेत. त्यात ११ व्या स्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, १२ व्या स्थानी मुंबई विद्यापीठ आणि ४३ व्या स्थानी पुण्याचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आहे.
या क्रमवारीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, राष्ट्रीय पातळीवरील या क्रमवारीमध्ये राज्य सार्वजनिक विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठाने मोठी झेप घेऊन राष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद कामगिरी नोंदविलेली आहे. सहभागी होणाऱ्या समग्र शैक्षणिक संस्थांची संख्या वाढती असतानाही शिवाजी विद्यापीठाचे या क्रमवारीतील स्थान उंचावले आहे. गेल्या काही वर्षांत एनआयआरएफच्या निकषांनुसार विद्यापीठातील शिक्षक, संशोधकांसह सर्वच घटकांनी आपली कामगिरी उंचावण्यासाठी परिश्रम घेतले, त्याचे हे फलित आहे. या सर्वच घटकांचे मी अभिनंदन करतो. भविष्यातही त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे स्थान आणि यशाची कमान अधिकाधिक उंचावत नेण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
“ही कामगिरी ही शिक्षक, संशोधक, विद्यार्थी व प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. पुढील काळातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची शैक्षणिक व संशोधनात्मक उंची वाढवण्याचा आमचा संकल्प आहे,” असे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
————————————————————————————————