कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
‘श्रावण मासी, हर्ष मानसी’ हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. यंदाचा श्रावण महिना २५ जुलैपासून ( शुक्रवार ) सुरू होत असून, पहिला श्रावणी सोमवार २८ जुलै रोजी आहे. चारही सोमवारांना शिवभक्तांचे लोंढे विविध मंदिरांत दर्शनासाठी आणि उपासनेसाठी उमटणार आहेत. शहर व परिसरातील प्रमुख शिवमंदिरांत भक्तांची विशेष गर्दी होणार आहे.
ही ठिकाणं भक्तांनी गजबजणार
कोल्हापुरातील श्रद्धास्थाने श्रावणात विशेष पूजनासाठी सज्ज झाली आहेत. शुक्रवार पेठेतील उत्तरेश्वर, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर, ऋणमुक्तेश्वर, अंबाबाई मंदिरातील अतिमहाबलेश्वर, ग्रामदैवत कपिलेश्वर, शिवाजी पेठेतील ब्रह्मेश्वर, मंगळवार पेठेतील कैलासगड स्वारी, रावणेश्वर, रेसकोर्स परिसरातील व कळंबा येथील वृंदावन, कळंबा जेलजवळील अमरनाथ मंदिर, तसेच आयटीआय गणेश कॉलनी येथील शिवालय हे ठिकाणं श्रावणात गजबजलेली दिसणार आहेत.
चार सोमवार – चार व्रते – चार धान्य !
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष मानला जातो आणि प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. यंदा श्रावणात खालीलप्रमाणे सोमवार येत आहेत
-
पहिला सोमवार – २८ जुलै : तांदूळ अर्पण
-
दुसरा सोमवार – ०४ ऑगस्ट : तीळ अर्पण
-
तिसरा सोमवार – ११ ऑगस्ट : मूग अर्पण
-
चौथा सोमवार – १८ ऑगस्ट : जवस अर्पण
या दिवशी शिवमूठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धान्यांचा अर्पण विधी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे त्या अनुषंगाने बाजारपेठांमध्ये तांदूळ, तीळ, मूग व जवस यांची मागणी वाढत आहे.
बाजारपेठा भक्तीमय खरेदीने गजबजल्या
श्रावणातील व्रते आणि पूजेच्या तयारीसाठी कोल्हापुरातील बाजारपेठांत जोरदार खरेदी सुरू झाली आहे. फुलांचे हार, बेलपत्र, भस्म, दुर्वा, पूजेचे साहित्य, उपवासाचे जिन्नस यांना विशेष मागणी असून, विक्रेतेसुद्धा या कालावधीसाठी तयारीत आहेत.
मंदिर परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रांग व्यवस्थापन, पिण्याचे पाणी व शौचालयांच्या सुविधा देण्यासाठी मंदिर समित्या सज्ज आहेत. श्रावण महिना म्हणजे श्रद्धेचा महिना. या महिन्यातील चारही सोमवार शहरातील शिवमंदिरांत भक्तांची अलोट गर्दी आणि भक्तिभावाने भरलेली दिसणार आहे. शिवमूठ अर्पण, व्रतवैकल्ये, पूजेचे विधी यामुळे कोल्हापुरात श्रावणाचा माहात्म्याने भरलेला उत्सव सुरू होत आहे.
———————————————————————————————–