नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम फैसला २० ऑगस्ट रोजी येणार असल्याची अपेक्षा होती. मात्र, आता हे प्रकरण पुन्हा लांबणीवर गेले असून, या बहुचर्चित वादावरचा निर्णय १५ सप्टेंबरनंतर किंवा थेट ऑक्टोबरमध्येच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या विलंबामागील प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपालांमधील अधिकाराच्या वादावर राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यावर सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेले घटनापीठ. या घटनापीठाच्या सुनावण्या १९ ऑगस्ट पासून ते १० सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत. विशेष बाब म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत या घटनापीठाचे सदस्य आहेत आणि त्यांच्याच खंडपीठासमोर शिवसेना वादाची सुनावणी देखील सुरू आहे. त्यामुळे शिवसेना प्रकरणाची सुनावणी स्वाभाविकपणे पुढे ढकलली गेली आहे.
यामुळे शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह कुणाचे, याचा निकाल आता १५ सप्टेंबर नंतरच अपेक्षित आहे. काही न्यायालयीन सूत्रांच्या मते, या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख कदाचित ऑक्टोबर मध्येच निश्चित होईल.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून या प्रकरणाच्या तातडीच्या सुनावणीसाठी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुद्धा या वादाला दोन वर्षे झाल्याने आता यावर अंतिम निर्णय द्यावाच लागेल, असे स्पष्टपणे नमूद केले होते. त्यानंतर २० ऑगस्ट ही तारीख ठरवण्यात आली होती. मात्र, आता ‘तारीख पे तारीख’ हीच स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
आता राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा अंतिम फैसला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्याही भवितव्यावर मोठा परिणाम करणारा हा निकाल आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते आहे.
———————————————————————————————